धुळेः भ्रष्टाचाररहित शासनाचा दावा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्याच्या विश्रामगृहातील बेहिशोबी रक्कम सापडल्याच्या चौकशी करुन संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हान माजी आमदार अनिल गोटे यांनी दिले आहे. दरम्यान धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील खोलीतून 1 करोड 84 लाख 84 हजार 200 रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात अद्यापही पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
विश्रामगृहातील एका खोलीत बेहिशोबी रक्कम असुन ही रक्कम विधिमंडळ पाहणी समितीसाठी गोळा केल्याचा आरोप करीत माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने संशयीत खोली बाहेर आंदोलन सुरू केले. धुळ्यातील विश्रामगृह मधील ही खोली क्रमांक 102 ही आमदारांच्या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावे 15 मे पासून बुक असून या खोलीमध्ये आमदारांच्या कमिटीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील वेगवेगळ्या विभागाकडून रक्कम गोळा केली गेल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी या खोलीबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांच्यासह महानगर प्रमुख धीरज पाटील ,भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, कपिल लिंगायत, अजय चौधरी, सागर निकम, सागर साळवे, अनिल शिरसाठ, आबा भडांगे, सलीम लंबू यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या खोलीमध्ये बेहिशोबी मालमत्ता लाच देण्यासाठी ठेवली असल्याची माहिती त्यांनी धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना भ्रमणध्वनीवरून गोटे यांनी दिली. त्याचप्रमाणे धुळ्याचे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी शेलार, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना देखील त्यांनी कळवली.
अखेर रात्री 11 वाजता महसूल आणि पोलीस विभागाचे पथक विश्रामगृहाच्या संशयित खोली जवळ पोहोचले. यात अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, प्रांत कदम, तहसीलदार वैशाली हिंगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार, धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, बांधकाम विभागाचे अभियंता आर. आर. पाटील यांच्यासह मोठा पोलीस फाटा उपस्थित होता. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच पत्रकारांना देखील संशयित खोली जवळ येण्यास प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर आंदोलकांच्या वतीने माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांना पंच म्हणून खोलीत येण्यास सहमती दर्शवल्याने खोलीचे कुलूप इन कॅमेरा तोडण्यात आले. त्यानंतर खोलीतील बेहिशोबी रकमेचा मोजदात सुरू करण्यात आली. पहाटे पावणेतीन वाजेपर्यंत ही मोजदात सुरू होती. यासाठी नोटा मोजण्याचे यंत्र वापरण्यात आले. अखेर या खोलीतून 1 करोड 84 लाख 84 हजार 200 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आज सकाळी कल्याण भवनात माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम आढळली. याची माहिती जबाबदार अधिकाऱ्यांना देऊन देखील त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आपला आता महाराष्ट्रातील पोलीस, सीआयडी, अँटी करप्शन यासारख्या तपास यंत्रणेवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनदी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे, डॉक्टर प्रवीण गेडाम, तसेच राहुल रेखावार यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची समिती बनवून चौकशी करावी. राज्यातील सरकार भ्रष्टाचार रहित असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे धाडस दाखवून कमिटीतील आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान गोटे यांनी यावेळी दिले.
धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केली जाते, याची तक्रार करून देखील पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. अमली पदार्थाच्या तस्करीत धुळे जिल्हा हा ‘उडता धुळे’ असा झाला. या धंद्याला केवळ राजकीय संरक्षणामुळे प्रतिष्ठा मिळाली आहे. विशेषतः शिरपूर तालुक्यात तर आमदाराच्या गावाच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये गांजा लावला गेल्याची तक्रार आपण केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले आमदार अशा पद्धतीने पैसे गोळा करतात, ही चीड येणारी बाब आहे.
पाहणी करण्याच्या नावाखाली शासकीय खर्चाने धुळ्यात आलेल्या आमदारांची ही कमिटी खाजगी हॉटेलमध्ये थांबतेच कशी, असा प्रश्न देखील गोटे यांनी उपस्थित केला. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या खोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम होती. मात्र आम्ही तेथे जाण्याचा पूर्वीच ही रक्कम लंपास केली गेली. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पाहिजे. धुळे जिल्ह्यातील पोलीस गुंडांनाच घाबरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे गुंड धुळ्याला त्रासदायक ठरणार आहेत. यातून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आता प्रत्येकालाच प्रयत्न करावे लागणार आहे, असे देखील गोटे यांनी सांगितले.