

धुळे : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश गो-तस्करीचा पर्दाफाश मंगळवारी (दि.20) रोजी रात्री आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. या कारवाईत शेकडो गोवंशांची सुटका करण्यात आली असून, या प्रकारात सामील सूत्रधारांवर कठोर कारवाईचे आदेश आमदार अग्रवाल यांनी पोलिसांना दिले आहेत.
ही गो-तस्करी उघडकीस आल्यानंतर आझादनगर पोलिसांनी 11 गायी, 56 बैल, 49 गोऱ्हे, 9 वासरे आणि 2 पारडू अशा एकूण 1217 जनावरांना ताब्यात घेऊन चाळीसगाव रोडवरील नवकार गोशाळेत हलवले. याप्रकरणी पोलिस तपास सुरू असून, अद्याप कोणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
शिवछत्रपती गोरक्ष जनआंदोलनचे संजय शर्मा आणि प्राणी फाउंडेशनच्या नेहा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षकांनी ही तक्रार आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या 25 एप्रिल 2024 च्या आदेशानुसार, बाजारात आणल्या जाणाऱ्या प्रत्येक जनावराच्या कानाला ईअर टॅग असणे बंधनकारक आहे. मात्र, बाजार समिती प्रशासनाने हे नियम पायदळी तुडवत ईअर टॅग नसलेल्या जनावरांची खुलेआम खरेदी-विक्री सुरू ठेवली. ही जनावरे कत्तलीसाठी पाठवली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
"बाजार समितीत बेकायदेशीर खरेदी-विक्री सुरू असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचा उल्लंघन होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच या प्रकारामागील सूत्रधारांवर कठोरात कठोर कारवाई करावी."
अनुप अग्रवाल, आमदार, धुळे
मंगळवारी (दि.20) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आमदार अग्रवाल, भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, भिकन वराडे, धीरज परदेशी, प्रणील मंडलिक, भुराभाऊ माळी आणि गोरक्षकांसह बाजार समितीत दाखल झाले. त्यांनी ईअर टॅग नसलेली जनावरे पाहताच पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, निरीक्षक निवृत्ती पवार, तुषार देवरे, श्रीराम पवार आणि शरद लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली आणि जनावरे ताब्यात घेतली.