

धुळे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मुख्य आरोपी यास वाचवण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप करून हे सरकार असंवेदनशील असून महाराष्ट्रात कायद्याचे सरकार नसून फायद्याचे सरकार असल्याची टीका धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी मुख्य आरोपी हा प्रति धनंजय असल्याचा टोला देखील लावला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी आका आणि त्यांना संरक्षण देणारा मंत्रिमंडळातील आका अशी टीका करून सरकारला धारेवर धरले असतानाच आता धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील सरकारला टीकेचे लक्ष केले आहे.
बीड जिल्ह्यांचे 'प्रति धनंजय'असलेले वाल्मीक कराड यांना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येतील मुख्य आरोपी म्हणून त्यांच्याविरुद्ध अख्खा महाराष्ट्र एका बाजूला आणि महायुतीचे प्रमुख तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका गोटे यांनी केली आहे. बीड, पुणे, धाराशिव, इत्यादी शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले. पण सरकारवर मात्र काहीही परिणाम होत नाही. इतके असंवेदनशील सरकार यापूर्वी देशात कुठेही आलेले नाही. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांची खुर्ची मागत नाहीत. न्याय मागत आहेत. पण या सरकारवर त्याचा काडी इतकाही परिणाम होत नाही, हे खरोखरच धक्कादायक आहे. असे गोटे यांनी नमूद केले आहे.
विधिमंडळात, आरोपींना मोक्का लावू, अशी घोषणा करून विरोधकांना शांत करण्याचे कसब मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखवले. पण त्याच वेळेला मुख्य संशयित आरोपी ज्याच्यावर १५-१५ गुन्हे आहेत, त्याला मात्र बाजूला ठेवण्यात आले.
मोक्का कायद्यातील कलम २ (ड) प्रमाणे ज्या आरोपीवर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. न्यायालयाने दखल घेतली आहे. अशा आरोपींना मोक्का लावता येतो. अशी तरतुद आहे. 'प्रति धनंजय' याच्या विरुद्ध तर प्राणघातक हल्ला, खंडणी इत्यादी गंभीर स्वरुपाचे १५ गुन्हे दाखल असताना त्याला मोक्का कायद्यातून वगळलेच कसे?, याचा अर्थ फडणवीसांचे महायुती सरकार संतोष देशमुख यांच्या निघृण हत्या करणाऱ्यांना संरक्षण देत आहे असाच होतो. असा आरोप देखील माजी आमदार गोटे यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत व्यक्तीचा विचार केला जात नाही, तर मोक्का कायदा हा त्या गुन्ह्याला किंवा केसला लागतो, असे असंख्य निर्णय दिले आहेत. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणी मात्र या गुन्ह्यातून संशयित आरोपी वाल्मीक कराड याला मात्र फडणवीस सरकारने सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. हे कायद्याचे सरकार नसून फायद्याचे सरकार झाले आहे, अशी टीका देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.