Tree Plantation pudhari photo
धुळे

Dhule News: धुळे जिल्ह्याचे 21.60 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

वृक्ष लागवडीचा कालावधी जून ते सप्टेंबर असा असल्याने अभियानाची अंमलबजावणी तातडीने करणे आवश्यक आहे

पुढारी वृत्तसेवा

धुळे : सन 2047 पर्यंत राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 33 टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली आणण्याच्या उद्देशाने राज्यात “300 कोटी वृक्ष लागवड अभियान (2026-2047)” राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी हरित महाराष्ट्र आयोग या विशेष उद्देशीय संस्थात्मक यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत सन 2026 साठी धुळे जिल्ह्यास एकूण 21.60 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे वृक्ष लागवड अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग तथा सदस्य सचिव यांनी उपस्थित विभागप्रमुखांना पीपीटीद्वारे अभियानाच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. तसेच आजअखेर झालेल्या वृक्ष लागवडीचा आढावा सादर करून उर्वरित वृक्ष लागवड निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची ‘अमृत वृक्ष’ ॲपवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी विभागनिहाय वृक्ष लागवड उद्दिष्ट व झालेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद, धुळेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत एकूण 2 लाख 46 हजार 528 वृक्ष लागवड पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

आढावा बैठकीदरम्यान कृषी विभाग, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रेशीम विभाग यांना वृक्ष लागवडीचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट देण्यात आले असतानाही संबंधित विभागप्रमुख बैठकीस अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित विभागांची कार्यवाही असमाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले. अनुपस्थित विभागप्रमुखांना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या स्वाक्षरीने नोटीस बजावून खुलासा मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या. समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास संबंधितांविरुद्ध कार्यवाहीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

जिल्ह्यात 6 ऑगस्ट 2026 अखेर प्राप्त अहवालानुसार एकूण 7.84 लाख वृक्ष लागवड पूर्ण झालेली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक रोपांची उपलब्धता सुनिश्चित करण्याबाबत उपजिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी सूचना दिल्या. जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात रोपे उपलब्ध नसल्यास इतर जिल्ह्यांमधून रोपे उपलब्ध करून घेण्याची शक्यता तपासण्याचे निर्देशही देण्यात आले.

वृक्ष लागवडीचा कालावधी जून ते सप्टेंबर असा असल्याने अभियानाची अंमलबजावणी तातडीने करणे आवश्यक आहे. शासनाचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने आवश्यक नियोजन करून आपल्या विभागास अथवा संबंधित प्राधिकरणास दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी केले. जिल्ह्यातील 300 कोटी वृक्ष लागवड अभियान प्रभावीपणे राबवून निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT