धुळे : शहरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचा गावठी कट्टा पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. या कारवाईत पिस्तूल काडतुस आणि एक रॉयल एनफिल्ड बुलेट असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकाने डी मार्ट जवळ संशयितांची चौकशी केली. चौकशी दरम्यान एका १७ वर्षीय बालकाने सागर जाधव याच्याकडून ४० हजारात कट्टा विकत घेऊन तो कुंतेश बागुल याच्या मार्फत कल्पेश यादव याच्याकडे ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी चाळीसगाव रोड परिसरात कल्पेश यादव याला ताब्यात घेऊन बुलेटच्या सीट खाली लपवलेल्या मॅगझीन सह गावठी कट्टा आणि चार काडतूस हस्तगत केली.
याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे अवैध्य शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे आणि पोलीस अंमलदार संदेश सिंग चव्हाण, शिरीश भदाणे, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, नरेंद्रसिंह गिरासे यांनी केली.