

धुळे : शिरपूर तालुक्यातील थाळनेर शिवारातील अतिदुर्गम जमाईपाडा परिसरात वन विभागाच्या जमिनीवर गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या संदर्भात पोलीस पथकाने 93 लाख 50 हजार रु. किंमतीचा 374 किलो गांजा हा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे.
थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना अतिदुर्गम जमाईपाडा या परिसरात गांजाची लागवड केली असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी या बातमीच्या आधारे अतिदुर्गम जमाईपाडा या परिसरात माहितीची खात्री केली. यात वनविभागाच्या जमिनीवर रविंद्र खुमसिंग पावरा, (रा. महादेव ता. शिरपूर) याने मकाचे पिकामध्ये मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा गांजा अंमली पदार्थ अवैधरित्या लागवड केल्याची खात्री केली.
यानंतर पोउनि हर्षल पाटील, पोलीस अंमलदार चतरसिंग खसावद, उमाकांत वाघ, विजय पाटील, अनिकेत साळुंखे, विनोद पावरा, रविंद्र कोकणी, आकाश साळुंखे, केशव जाधव, कैलास महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार देवेंद्र ठाकुर, गुलाब पाटील यांनी या शेतावर छापा टाकला. पोलीसांची चाहुल लागल्याने आरोपी शेतातुन पळून गेला आहे.
या कारवाई मध्ये थाळनेर पोलिसांनी अतिदुर्गम जमाईपाडा या परिसरात वनविभागाच्या जमिनीवर इसम रविंद्र खुमसिंग पावरा हा कसत असलेल्या वनजमिनीवर छापा टाकून, एकूण 93 लाख 50 हजार रु. किंमतीचा 374 किलो मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश्य अंमली पदार्थ (कॅनाबीस) हस्तगत करुन थाळनेर पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(c), 20(अ) (i), 28 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.