

धुळे : अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने दोन पिकअप वाहने जप्त करून त्यातून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूचा साठा जप्त केला आहे. गुजरात राज्यातून हा साठा महाराष्ट्रात आल्यानंतर ही कारवाई झाली आहे. या कारवाईत एकूण ६१ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी चार जणांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात ४४ हजार ७० पाकिटे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ तसेच दोन पिकअप वाहने असा एकूण ६१ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरत-नागपूर महामार्गावरील धुळे तालुक्यातील मोराणे प्र. लळींग शिवारात हॉटेल उदय काठियावाडसमोर ही कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी दोन पिकअप वाहन संशयीत रित्या उभे असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार या पथकाने पोलिसांच्या मदतीने घटनास्थळ गाठले असता या ठिकाणी एमएच ०४ जेके ६९७५ व जीजे २६ टी ४५३८ या दोन्ही पिकअप गाड्या आढळून आल्या या गाड्यांची तपासणी केली असता एमएच ०४ या पिकअपमधून २५ लाख ६३ हजार ५०० रुपयांची विमल पानमसाला व व्ही-१ सुगंधित तंबाखूची एकूण १३ हजार ९५० पाकिटे आढळून आली .
तसेच दुसऱ्या जीजे २६ टी ४५३८ या पिकअपमधून २७ लाख ९१ हजार ५०० रुपयांची विमल पान मसाला व व्ही-१ तंबाखूची एकूण ३० हजार १२० पाकिटे, तसेच ५ लाख रुपये किमतीचे वाहून जप्त करण्यात आले. दोन्ही वाहनांसह एकुण ६१ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पिकअप चालक देव्याभाई दिवाणजी गामित , दाऊद भाई किलीनभाई गामित , पिकअप चालक कल्पेशभाई मनुभाई गामित आणि गुलाब जिभाई बल्ल्या गामित, (सर्व रा. सिन्नीत, ता. सोनगड, जि. तापी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.