Dhule couple Deadbody found at tapi river  Pudhari photo
धुळे

Dhule couple Deadbody | धक्कादायक! एक पाय साखळीने बांधून कुलूप लावलेला दाम्पत्याचा मृतदेह आढळला तापी नदीत

Dhule couple bodies found-तापी नदी पात्रात दाम्पत्याचा मृतदेह आढळला, दोघांचाही एक पाय साखळीने बांधून कुलूप बंद असल्याने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शिरपूर तालुक्यातील सावळदे नजीक तापी नदी पात्रात आढळलेल्या महिला आणि पुरुषाच्या मृतदेहाची आता ओळख पटली आहे. हे दोघेही जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी काही वर्षांपूर्वी प्रेम विवाह केल्याची बाब प्राथमिक तपासात पुढे आली आहे. विशेष म्हणजे या दांपत्याने त्यांचा एक पाय साखळीने बांधून तो कुलूप बंद केल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता नरडाणा पोलिसांनी हा घातपात आहे का, याविषयीचा तपास सुरू केला आहे.

तापी नदीच्या पात्रात सावळदे नदीत महिला आणि पुरुष याचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे नरडाणा पोलिसांना ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाजवळ आढळलेल्या वस्तूंनुसार प्राथमिक तपास केला असता या दोघांची ओळख पटली आहे. यातील मयतांची नावे श्याम हरी पाटील (वय 28) आणि सपना श्याम पाटील (वय 20) अशी असल्याचे निदर्शनास आले आहे.

हे दोघेही अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील राहणारे असून सध्या ते एरंडोल तालुक्यातील उतरण येथे वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून ते बाहेरगावी गेले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. मात्र अचानक त्यांचा मृतदेह सावळदे नजीकच्या तापी नदीच्या पात्रामध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे या दोघांचा एक पाय साखळीने बांधलेला असून त्यावर मोठे कुलूप लावण्यात आल्याची बाब पोलिसांना निदर्शनास आली आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात याविषयीचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.

दरम्यान श्याम पाटील हा पाडळसे येथील राहणारे असला तरी तो सध्या उद्योगाच्या निमित्ताने उतरण येथे वास्तव्यास होता. याच ठिकाणी सपना देखील त्यांच्या बहिणीकडे राहत असल्याने या दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी प्रेम विवाह केला. मात्र आता दोघांचेही मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची नरडाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT