HPV Vaccine Pudhari
धुळे

Dhule Collector | एचपीव्ही लसीकरणासाठी पालकांशी संवाद वाढवावा : जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

जिल्हाधिकारी विसपुते यांनी नगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

पुढारी वृत्तसेवा

HPV Vaccination Dhule

धुळे : एचपीव्ही लसीकरणामुळे भविष्यात युवतींमध्ये होणारा गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळता येऊ शकतो. त्यामुळे पात्र मुलींना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी पालकांशी अधिक संवाद साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी विसपुते यांनी नगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश सोनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी सांगितले की, एचपीव्ही लसीकरण अभियान अत्यंत महत्त्वाचे असून, याबाबतचे गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. गावागावांत जनजागृती करून आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी यांनी घरभेटी, शाळा आणि ग्रामसभा यांच्या माध्यमातून पालकांशी संवाद साधावा. लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगून एकही पात्र युवती या मोहिमेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.

आरोग्य सेवा अधिक प्रभावी व गतिमान पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवून निरोगी समाज घडविण्यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार सेवा द्याव्यात, गर्भवती महिला व बालकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, स्वच्छता राखावी आणि संसर्गजन्य आजारांविषयी जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले. गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी विसपुते यांनी आरोग्य केंद्रातील स्वच्छता, औषधसाठा, रुग्णसेवा, लसीकरणाची अंमलबजावणी आणि नोंदवही यांचा सविस्तर आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT