

सोनगीर : येथील प्रलंबित मध्यवर्ती बस स्थानकाचा प्रश्न आणि मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्विस रोडचे अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी खासदार डॉ. शोभा बच्छाव आणि माजी आ. कुणाल पाटील यांना निवेदनाद्वारे साकडे घातले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त हे दोन्ही मान्यवर गावात आले असता, बस स्थानक कृती समिती व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी खा. डॉ. शोभा बच्छाव यांनी तातडीने सूत्रे हलवत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे धुळे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. बस स्थानकाच्या जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती व्यवहारे यांनी दिली. या प्रस्तावाचा आपण व्यक्तिशः पाठपुरावा करून निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही डॉ. बच्छाव यांनी ग्रामस्थांना दिली. यावेळी माजी आ. कुणाल पाटील यांनीही आपली भूमिका मांडताना सांगितले की, आमदार असल्यापासून मी या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे; आता मी भारतीय जनता पार्टीत सामील झाल्यामुळे आणि केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असल्याने हा प्रश्न मार्गी लावणे अधिक सुलभ होईल.
दुसरीकडे, वाघाडी फाट्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामांतर्गत सर्विस रोडच्या त्रुटीबाबतही गावकऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्विस रोड तयार होत असताना, सोनगीर गावाजवळ दर्ग्याशेजारी जुन्या आणि नवीन रत्यामध्ये सुमारे 205 मीटरचे अंतर वगळण्यात आले आहे. यामुळे वाहनधारकांना पुन्हा मुख्य महामार्गावर यावे लागणार असून अपघातांचा धोका वाढला आहे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश देवरे यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर, खासदार बच्छाव यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) प्रकल्प संचालकांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या.
लोकार्पण सोहळा आटोपल्यानंतर डॉ. शोभा बच्छाव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सर्विस रोडची पाहणी केली आणि हा रस्ता सलग जोडला जावा, जेणेकरून प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही, असे निर्देश दिले. यावेळी मध्यवर्ती बस स्थानक कृती समितीचे पदाधिकारी मुरलीधर मोरे, प्रमोद धनगर, एल बी चौधरी,अमित बागुल, दिलीप माळी,जितेंद्र बागुल, हसन खा पठाण,दिनेश देवरे, देविसीग सोनवणे, पराग देशमुख, भुषण मोरे, अशोक माळी, सनी मोरे आणि गावकरी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.