Bahawalpuri Community President Attack
धुळे : बहावलपुरी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळ होऊ नये, यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या बहावलपुरी समाजाचे अध्यक्ष ललित तनेजा यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणात अखेर आठ महिन्यांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी नगरसेवक ललित आरुजा यांच्यासह दहा जणांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
धुळे शहरातील साक्री रोड परिसरात १३ एप्रिल २०२६ रोजी बहावलपुरी दिनानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. मिरवणूक कुमारनगर परिसरातील एका चौकात आली असता नगरसेवक ललित आरुजा यांच्या घराजवळ त्यांच्या समर्थकांकडून गोंधळ घातला जात असल्याचा आरोप आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून समाजाचे अध्यक्ष ललित तनेजा यांनी संबंधितांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी त्यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मिरवणुकीत वाद होऊ नये म्हणून ती पुढे नेण्यात आली.
रात्री साडेदहाच्या सुमारास मिरवणूक गुरुनानक सोसायटीत पोहोचल्यानंतर समाजभवनातील व्यवस्था पाहण्यासाठी ललित तनेजा हे नटवर तनेजा आणि दीपक तनेजा यांच्यासह निघाले होते. त्यावेळी नगरसेवक आरुजा यांचा पुतण्या काही जणांसह तेथे आला. या जमावाने दगडफेक करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर समाजभवनाकडे जात असताना तनेजा यांना अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या अन्य दोघांनाही मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही ललित तनेजा हे नगरसेवक ललित आरुजा यांच्या घरी गेले असता, 'तू वाचलाच कसा, तुझी सुपारी दिली आहे,' अशी धमकी देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर तनेजा यांनी पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, गुन्हा दाखल होत नसल्याने त्यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक, राज्याचे पोलीस महासंचालक, गृह विभागाचे सचिव तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पुराव्यांसह तक्रारी केल्या. संबंधित स्तरावरून धुळे जिल्हा पोलीस दलाला या प्रकरणाची दखल घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तरीही गुन्हा दाखल न झाल्याने अखेर तनेजा यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचे अवलोकन करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार धुळे शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक ललित आरुजा, आशिष उर्फ आशु आरुजा, मयूर नरेश सिंधी, अतुल मनोज गुंडीयाल, हरू निरंजनदास पोपली, जतीन संजय भगत, अक्षय नीलू कटारिया, भावेश अनिल रेलन, अतुल नरेंद्र वधवा आणि देव नीलू कटारिया या दहा जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, १८९ (१), १८९ (२), १८९ (४), १९०, १९१ (१), १९१ (२), १९१ (३), ६१ (२), ४९, ११५ (२), ११८ (२), ३५१ (२), ३५१ (३) आणि ३५२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची तक्रार करूनही गुन्हा दाखल होण्यासाठी आठ महिने लागल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरच गुन्हा नोंदविण्यात आल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.