

पिंपळनेर :महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पानमसाल्याच्या बेकायदेशीर विक्री आणि साठवणुकीविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने पिंपळनेर येथे मोठी कारवाई केली आहे.या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल ३० लाख ९१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पथकाच्या हाती लागला. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने आज मध्यरात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास पिंपळनेर येथील सटाणा रोडवरील भारत गॅस, ईदगापाडा परिसरातील दुकानावर व वाहनांवर छापा टाकला.तेथे उभ्या असलेल्या एमएच ४६ बीएम ६०९७ आणि एमएच बीयू ७८८५ या वाहनांची तसेच दुकानाची झाडाझडती घेतली असता, महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला पानमसाला, गुटखा आणि तंबाखूचा मोठा साठा छुप्या पद्धतीने ठेवलेला आढळून आला.
जप्त केलेला साठा पुढील कारवाईसाठी पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आला.त्याची मोजणी केली असता एकूण २०,३८२ पॅकेट्स आढळून आले. या मुद्देमालाची एकूण बाजारपेठेतील किंमत ३० लाख ९१ हजार ९०० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी साहेबराव वंजी साबळे,गणेश वंजी साबळे व संदीप गुलाब ठाकरे,तिघे रा. बल्हाने,ता. साक्री यांच्याविरुध्द पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे,सह आयुक्त (अन्न) मंगेश माने आणि धुळे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार,शशिकांत राणे,अरविंद राऊत व मंगेश भावसार यांच्या पथकाने केली.