Dhule Farmers Second Loan Waiver List
धुळे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत धुळे जिल्ह्यातील ३,५९८ पात्र शेतकऱ्यांचा दुसऱ्या कर्जमुक्ती यादीत समावेश करण्यात आला आहे. शासनाने ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या या यादीमुळे संबंधित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यादीतील शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेले आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पीक कर्ज, पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्ज यामध्ये समाविष्ट आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे होत असून, महाआयटीमार्फत तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर बँकांनी ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय प्रक्रियेनंतर १६.९६ लाख पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १२.५८ लाख लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर १०,११४.९० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
आता ११ सप्टेंबर रोजी ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात धुळे जिल्ह्यातील ३,५९८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. नाशिक विभागातील एकूण २५,४७१ लाभार्थ्यांमध्ये अहिल्यानगर ९,४०४, धुळे ३,५९८, जळगाव ७,३१६, नंदुरबार १,३४५ आणि नाशिक जिल्ह्यातील ३,८०८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी परिशिष्ट ‘अ’ आणि बँकनिहाय यादी परिशिष्ट ‘ब’मध्ये देण्यात आली आहे. संबंधित यादी बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. धुळे जिल्ह्यातील दुसऱ्या यादीत जिल्हा बँकेशी संबंधित १५२ लाभार्थी आहेत.
यादीतील शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकीची गणना ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार करण्यात आली आहे. त्यानंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी कर्ज थकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रमाणीकरणानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यावर जमा केली जाणार आहे.
मृत शेतकरी, वयोवृद्ध तसेच बोटांच्या ठशांची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली जारी केली आहे.
ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी महत्त्वाची योजना आहे. धुळे जिल्ह्यातील दुसऱ्या यादीत समाविष्ट सर्व ३,५९८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा. बँका आणि संबंधित यंत्रणांनीही लाभार्थ्यांना आवश्यक सहकार्य करावे.- पालकमंत्री जयकुमार रावल