

धुळे : राज्यभरात गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटच्या वापरावरून वाद सुरू असतानाच, धुळे जिल्हा पोलीस दलाने गणेशोत्सवात डॉल्बी सिस्टम आणि लेझर लाईटला पूर्णपणे बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
धुळे जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ (१) अन्वये १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
गेल्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीमच्या अतिवापरामुळे काही भाविकांना कान व छातीचा त्रास होऊन आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच, लेझर लाईटच्या तीव्र किरणांमुळे विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे निदर्शनास आले होते. यंदाच्या उत्सवांमध्येही मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघणार असल्याने मानवी जीवित, आरोग्य व सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.