आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. Pudhari
धुळे

धुळेकरांच्या स्वप्नातील २१ फुटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अखेर प्रतिष्ठापना

सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर स्मारकाच्या कामाला गती

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Shivaji Maharaj Statue

धुळे : धुळे शहरातील मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या ठिकाणी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला २१ फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने स्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवल्यानंतर हे काम पुन्हा सुरू झाले असून, शहरातील शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

मालेगाव रोडवरील जुन्या स्मारकाच्या जागी २१ फूट उंच पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक उभारण्याची संकल्पना आमदार अनुप अग्रवाल यांनी मांडली होती. मात्र, या प्रकल्पाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून स्मारकाचे काम रखडले होते.

यानंतर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती उठविण्याची विनंती केली. या याचिकेवरील सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेली स्थगिती उठविल्याने स्मारकाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, भाजपच्या प्रदेश सहसंयोजिका अल्पा अग्रवाल, डॉ. माधुरी बोरसे-बाफना, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, गटनेत्या किरण कुलेवार, नगरसेविका योगिता कुटे, पूनम शिरसाट, वैभवी दुसाने तसेच भाजपचे पदाधिकारी, मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासकामांना विरोध केल्याचा आमदार अग्रवाल यांचा आरोप

यावेळी बोलताना आमदार अनुप अग्रवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यास झालेल्या विलंबाबद्दल खंत व्यक्त केली. स्मारकाच्या कामाला न्यायालयीन प्रक्रियेमुळे उशीर झाला असून त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील आदिशक्ती श्री एकवीरामाता मंदिरासमोरील प्रस्तावित ५१ शक्तिपीठ प्रकल्प तसेच टॉवर गार्डनसारख्या अन्य विकासकामांनाही न्यायालयीन प्रक्रियेद्वारे अडथळे निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील विकासकामांमध्ये विनाकारण अडथळे आणले जात असल्याचा दावा करत, याबाबत नागरिकांनीही भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT