Anil Gote : रस्ता लूट प्रकरणातील फरार आरोपीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना मंजुरी मिळतेच कशी file photo
धुळे

Anil Gote : रस्ता लूट प्रकरणातील फरार आरोपीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना मंजुरी मिळतेच कशी

माजी आमदार अनिल गोटे यांचे धुळे जिल्हा पोलीस प्रशासनावर टीकास्त्र

पुढारी वृत्तसेवा

Anil Gote: How come the cultural programs of the fugitive accused in the road robbery case get sanctioned

धुळे : पुढारी वृत्तसेवा नकली नोटांचे अमिष दाखवून 2022 मध्ये रस्ता लूट करणारा धुळे तालुक्यातील अजनाळे येथील चॅम्पियन चव्हाण याला आता अटक करण्यात आली आहे. मात्र याच चव्हाण याच्या माध्यमातून माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कलावंत गौतमी पाटील यांचा कार्यक्रम घेण्यात आला. अशा पद्धतीने गंभीर गुन्ह्यात फरार असणाऱ्या आरोपी याचा सहभाग असणाऱ्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे. अशा कुख्यात आरोपीला मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

नकली नोटांचे आमिष दाखवून २०२२ मध्ये म्हणजे तब्बल पाच वर्षांपूर्वी रस्ता लूट झाली होती. प्रत्यक्षात गुन्हा मार्च २०२४ मध्ये दाखल करण्यात आला. मात्र या कारवाई संदर्भात आता माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलीस प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे.

नागमणी देतो, तांत्रिक व मांत्रिकांना अधोरी पूजेसाठी आवश्यक असणारे दोन तोंडाचे मांडूळ सर्प, याचा गैरफायदा घेऊन, चॅम्पियन याच्यावर ठाण्यापासून धुळ्यापर्यंत वन विभागाच्या कायद्याअंतर्गत तसेच फसवणूक करणे, धाक दपटशा दाखवणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, रस्ता लूट करणे इत्यादी गंभीर कलमाखाली अनेक गुन्हे दाखल आहेत.

विनोद उर्फ चॅम्पियन चव्हाण याने दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी माजी आमदार कुणाल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्याकरीता गौतमी पाटील यांचा कार्यक्रम घेतला. पण चॅम्पियन चव्हाण हा पोलिसांना हवा असणारा आरोपी असताना त्याने स्वतःच्या नावावर धुळे शहरात कुणाल पाटलांच्या नावाने लावलेले वाढदिवसाचे बॅनर पोलिसांना दिसले नाही का, असा प्रश्न गोटे यांनी उपस्थित केला आहे.

एवढा गुन्हेगार, माजी आमदाराचा वाढदिवस साजरा करण्याकरीता गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करतो, सदर कार्यक्रमासाठी त्याला पोलिसांनी परवानगी दिली कशी, तो जर वान्टेड होता, तर, कार्यक्रम आयोजित करू कसा शकतो, असे प्रश्न उपस्थित करून धुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कोमात जाऊन संवेदनशून्य झाली काय?, असा टोला गोटे यांनी लगावला आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे २०२२ मध्ये देवळा तालुक्यातील वखारी येथे राहणारे नानाजी शहाजी यांनी तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी नेमका काय तपास केला, हा प्रश्न निर्माण होतो. चव्हाण हा कुसुंबा मालेगाव रस्त्यावरील अजनाळे या गावातील राहणारा असून, धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगोरी यांनी स्वतः सदर प्रकरणी लक्ष घालून, अशा सराईत गुन्हेगारावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी. अशी मागणी गोटे यांनी केली आहे.

कुसुंबा रोड येथे सायंकाळ नंतर आम जनता प्रवास करण्यासाठी सुध्दा घाबरायची. रस्त्यावर ग्रीस लावून किंवा ऑईल टाकून जे दुचाकी वाहने घसरून पडायची त्यांना मारहाण करून लूटमार करणे, अपघातग्रस्त गाड्यांमधील प्रवाशांचे सोने, पैसा लुटणे, असे अनेक प्रकार या भागातील सक्रीय गैंग मार्फत होत असल्याने धुळे पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी यांनी अधीक लक्ष घालून या गुन्हेगारीचा बिमोड करावा, अशी जनतेची अपेक्षा आहे असेही अनिल गोटे यांनी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT