धुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने नाकाबंदी आणि ऑल आऊट ऑपरेशन राबविले.  Pudhari News Network
धुळे

धुळे जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन; ६ पिस्टल, ४ तलवारी जप्त

Dhule News | पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने केलेल्या नाकाबंदी आणि ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान सहा पिस्टल आणि चार तलवारी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. या कारवाई दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देखील तपासण्यात आले असून नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांकडून तब्बल 1 लाख 23 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Dhule News)

विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या सूचनेनुसार उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी धुळे जिल्ह्यात नाकाबंदी आणि ऑल आऊट ऑपरेशन राबवण्याचे निर्देश दिले होते. (Dhule News)

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 21 जणांवर गुन्हे

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी 22 ठिकाणी नाकाबंदीची ठिकाणे निश्चित केले. हे अभियान राबवण्यासाठी 28 पोलीस अधिकारी आणि 166 पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली. या दरम्यान 1031 दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. तर रेकॉर्डवरील 39 गुन्हेगारांना तपासण्यात आले. विशेषता दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 103 हॉटेल, लॉज आणि ढाब्यांची तपासणी देखील करण्यात आली. (Dhule News)

15 जणांना समन्स तर 14 जणांना वॉरंट

दारूबंदी कायद्यानुसार नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याच अभियान दरम्यान 15 जणांना समन्स तर 14 जणांना वॉरंट बजावणी करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यान्वये 149 केसेस करण्यात आल्या असून एक लाख 23 हजार 7 50 रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.(Dhule News)

गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

या कारवाई दरम्यान दहशत माजवण्याच्या उद्देशाने विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या पाच जणांवर हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा गावठी बनावटीचे पिस्टल आणि सात जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. यात धुळे शहरातील भाईजी नगर परिसरात राहणारा सुरज प्रकाश मार्कंड यांच्याकडून एक पिस्टल आणि एक राऊंड, आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासिफ शेख गुलाब मोहम्मद याच्याकडून एक पिस्टल, देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मा मोरे यांच्याकडून एक पिस्टल आणि दोन राऊंड, धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुनील उर्फ सनी धर्मा अहिरे यांच्याकडून दोन पिस्टल आणि दोन राउंड तर शिरपूर तालुक्यातून रवी मोहन सोनी याच्याकडून एक पिस्टल आणि दोन राऊंड जप्त करण्यात आले.

विना परवाना तलवार बाळगणाऱ्या तीन जणांवर देखील गुन्हे

याशिवाय विना परवाना तलवार बाळगणाऱ्या तीन जणांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून दोन तलवार एक कोयता आणि एक चॉपर जप्त करण्यात आला आहे. यात धुळे शहरातील रोहित संतोष गवळी, दोंडाईचा मधील शाहिद शहा जावेद शहा, मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील अजय संदीप सोनवणे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या परिसरातील नाझीम बाली तर पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या परिसरातील गणेश चंद्रकांत गवळी याचा समावेश आहे.

32 जिम्नॅस्टिक आणि व्यायाम शाळांची देखील झडती

त्याचप्रमाणे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या परिसरातून मोहम्मद मोबीन जलील अहमद अन्सारी यांच्या ताब्यातून विनापरवाना गुंगीकारक औषधाच्या बाटल्या जप्त करण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच धुळे जिल्ह्यामध्ये प्रथमच धुळे शहर उपविभागातील एकूण 32 जिम्नॅस्टिक आणि व्यायाम शाळांची देखील झडती घेण्यात आली. यात प्रशासनाने बंदी घातलेले इंजेक्शनची तपासणी करण्यात आली. बऱ्याच जिम मध्ये तरुण त्यांची बॉडी लवकर तयार करण्यासाठी या इंजेक्शनचा वापर करतात, अशी माहिती होती. या हेतूने ही तपासणी करण्यात येऊन जिमचे संचालक यांना समज देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे धुळे तालुका आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर फरार असणाऱ्या आरोपींपैकी तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

वाळखोर आणि असमाजिक घटकांवर कारवाई

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, यापुढे देखील धुळे जिल्ह्यात अशाच प्रकारे आगामी विधानसभा निवडणुका आणि सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी नाकाबंदी कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात येऊन गुंडगिरी करणारे टवाळखोर आणि असमाजिक घटकांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाया करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT