Dhule News | धुळे जिल्ह्यात लावणार 50 लाख झाडे

मजुरांना रोजगाराची संधी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल
dhule news
धुळ्यात वर्षभरात लावणार 50 लाख झाडे pudhari photo

धुळे : पर्यावरणाचा समतोल राखणे आणि निसर्गाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी यावर्षी जिल्ह्यात 50 लक्ष वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातून वृक्ष लागवडीबरोबरच नरेगाअंतर्गत मजुरांना रोजगाराचीही संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

धुळे तालुक्यातील सांजोरी येथे धुळे वनविभागच्यावतीने ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’व ‘एक पेड मा के नाम’अभियानातंर्गत वनविभाग व रोहयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिसरण पद्धतीने धुळे तालुक्यातील सांजोरी गावात 22 हेक्टरवर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी गोयल बोलत होते.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, धुळे वनवृत्तच्या मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) निनू सोमराज, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, परिविक्षाधीन प्रशासकीय अधिकारी सर्वानंद डी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीनकुमार मुंडावरे, विभागीय वन अधिकारी (दक्षता) राजेंद्र सदगीर, विभागीय वनअधिकारी (नियोजन) संजय मोरे, तहसिलदार अरुण शेवाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ आदी उपस्थित होते.

dhule news
धुळे : भोरखेडा येथे 'पुष्पा स्टाईल'ने चंदनाची चोरी

मजुरांना 500 रुपये प्रतिदिन

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, जिल्ह्यात यावर्षी 50 लक्ष वृक्ष लागवड करणार आहे. त्यानुसार वनविभाग व रोजगार हमी योजनेच्या संयुक्त अभिसरणातून आपण वन विभागाच्या जागेवर वृक्ष लागवड करीत आहे. या वृक्षलागवडीसाठी मजुरांना 500 रुपये प्रतिदिन रोजगार मिळणार आहे. यात 300 रुपये नरेगा आणि 200 रुपये राज्य शासनाकडून देण्यात येईल. या योजनेत सांजोरी गावातील गावकऱ्यांना रोजगाराची एक चांगली संधी असून सांजोरी गावातील रोजगार हमी योजनेच्या जॉबकार्ड धारकांनी या वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग घेतला तर त्यांना मोठया प्रमाणात रोजगार ही उपलब्ध होणार असून गावाचा विकास होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे 22 हेक्टरवर वृक्षलागवड झाल्याने सांजोरी गावाचे उत्तम उदाहरण जिल्ह्यात तयार होईल. याशिवाय गावास माझी वसुधंरा पुरस्कार, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार योजनेत सहभागी होता येणार आहे. तरी ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचा संकल्प करुन ही मोहीम लोकचळवळ म्हणुन राबवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वनाचे आच्छादन वाढविण्याचे आवाहन

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) नितू सोमराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना म्हणाल्या की, राज्य शासनामार्फत 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा करण्यात येत असून या कालावधीत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी. यावर्षी केंद्र शासनाकडून ‘एक पेड मा के नाम’हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपल्या राज्यात वनाचे क्षेत्र 20 टक्के आहे. ते 20 टक्केपासून 35 टक्यांपर्यंत वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधारणत: 9 ते 18 महिन्याचे वृक्ष सवलतीच्या दरात नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचा प्रमुख उद्देश मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे हा आहे. तसेच वृक्षलागवड करतांना वनविभाग व रोजगार हमी योजनेच्या अभिसरनातून वृक्षारोपणाचे काम केले जाणार आहे. त्याठिकाणी एका दिवसात जर एका मजुराने 100 वृक्षाची लागवड केली तर त्यांना साधारणत: 500 रुपये मजुरीही मिळणार असून या योजनेत गावकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. तसेच वृक्षरोपण कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्याथीं, महिला बचतगटांनी सहभागी होऊन वृक्ष लागवड करुन वनाचे आच्छादन वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग यांनी तर सूत्रसंचालन कोमल जाधव, आभार प्रदर्शन वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ यांनी केले. या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचेसह सांजोरी गावातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news