उत्तर महाराष्ट्र

Dhule : अमृत महोत्सवी वर्षाच्या मॅरेथानमध्ये धावले अवघे धुळेकर

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दहा किलोमीटरच्या खुल्या मॅरेथानला धुळेकरांनी आज भरभरुन प्रतिसाद दिला. सकाळी सहा वाजेपासूनच स्पर्धक आले होते. आमदार मंजुळा गावित आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविल्यावर धुळेकरांनी धावण्यास सुरवात केली. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी पोलिस बँडवर देशभक्तिपर गीते वाजविली जात होती, तर ठिकठिकाणी शालेय विद्यार्थी टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धकांचे स्वागत करत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मॅरेथॉनला सुरवात झाली. पाचकंदील, आग्रा रोड, फुलवाला चौक, मोठा पूल, नेहरू चौक, दत्तमंदिर पुन्हा नेहरू चौक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, वीर सावरकर यांचा पुतळा, जिल्हाधिकारी निवासस्थानमार्गे गरुड मैदानावर मॅरेथानचा समारोप झाला.

मॅरेथानच्या उदघाटन सोहळ्यास आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी शर्मा, राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक प्रल्हाद खाडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, उपजिल्हाधिकारी तथा अमृत महोत्स्व वर्ष समन्वय समितीचे समन्वयक गोविंद दाणेज (रोहयो), उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, धुळे जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष डॉ. महेश घुगरी, खो- खोपटू पंढरीनाथ बडगुजर, हेमंत भदाणे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या धुळे शाखेचे पदाधिकारी, माहेश्वरी मंडळ, धुळे जिल्हा क्रीडा महासंघासह विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमदार गावित यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे स्पर्धा होत आहेत. नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम सुरू आहेत. आज मॅरेथान झाली. शनिवारी 13 ऑगस्ट रोजी सायकलिंग, चालणे आदी स्पर्धा होतील. या स्पर्धांनाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. तसेच उद्यापासून 15 ऑगस्ट पर्यंत घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक धुळेकर नागरिकांनी सहभागी होत देशाप्रती आदर व्यक्त करावा, असेही त्यांनी नमूद केले. जिल्हा क्रीडाधिकारी जाधव यांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे सुरू असलेल्या स्पर्धांची सविस्तर माहिती दिली. मॅरेथान कालावधीत पोलिस दलाने मॅरेथॉन मार्गावरील वाहतुकीचे नियोजन केले होते. त्यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT