

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोथरूड पोलिसांनी एका सराईत चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरीचे 2 लाख रुपये किमतीचे 27 मोबाईल, दुचाकी जप्त केली आहे. राहुल राजकुमार वसनानी (वय 35, रा. पिंपरी) असे त्याचे नाव आहे. राहुल हा सराईत मोबाईल चोरटा आहे. काम देण्याच्या बहाण्याने किंवा फोन लावण्याच्या बहाण्याने तो एकट्या व्यक्तीला रस्त्यात गाठत होता. त्यानंतर तो त्याचा मोबाईल क्रमांक समोरच्या व्यक्तीला मोबाईलमध्ये डायल करून घेण्यास सांगत होता. व्यक्तीने खिशातून मोबाईल काढण्याचा अवधी मिळताच अवघ्या काही सेकंदांत त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढत होता.
अशा प्रकारे त्याने अनेक व्यक्तींचे मोबाईल चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीचे मोबाईल तो ओळखीतल्या व्यक्तीकडे गहाण ठेवून त्याच्यावर पैसे उचलत असल्याचे देखीलसमोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या सूचनेनुसार, पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. कुलकर्णी हे पथकासह डुक्करखिंड येथे नाकाबंदी कर्तव्यावर होते. त्या वेळी एक दुचाकीस्वार नाकाबंदी पाहून पळून जात होता. त्या वेळी पोलिस कर्मचारी पवार व राऊत या दोघांनी त्याला पाठलाग करून पकडले.
त्याच्याकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता, प्लॅस्टिकच्या पिशवीत विविध प्रकारचे 30 सीमकार्ड, पाच मेमरी कार्ड व वेगवेगळ्या कंपनीचे अॅण्ड्रॉईड मोबाईल मिळून आले. त्याच्याकडील हे सर्व मोबाईल चोरी केल्याची कबुली त्याने दिली. कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेला एक गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला असून, इतर मोबाईल त्याने कोठून चोरी केले आहेेत, याचा तपास पोलिस
करीत आहेत.