पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील मौजे उंभर्टी धरणाची गळती थांबवून पाटचारीचे अपूर्ण काम पूर्ण करावे. साक्री तालुक्यातील उंभर्टी येथे सन २०१६-१७ मध्ये राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या दोन्ही धरणांना गळती लागली आहे. वारंवार निवेदने देवून व तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने उंभर्टी येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या तरुणांनी धुळ्यात अर्धनग्न आंदोलन केले.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनासह विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, उंभर्टी येथील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराला प्रहारचे साक्री तालुका प्रमुख कैलास भदाणे यांनी वाचा फोडली. सदरचे काम नित्कृष्ट असल्याचा पुरावाही समोर आला. दि.१८ ऑगस्ट २०१९ पासून या दोन्ही धरणांना गळती लागली आहे. मात्र आजपावेतो ही गळती थांबविण्याचे कुठलेही प्रयत्न लघुसिंचन विभागाकडून झालेले नाहीत. इतकेच नव्हे तर याठिकाणी १६ जून २०२० रोजी अधिकाऱ्यांनी निरिक्षण दौरा केल्याचेही खोटे रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे.
सदर कामाचे ठेकेदार हे मयुर कन्स्ट्रक्शन, चिकसे हे असून पाच वर्षे देखभालीची व दुरूस्तीची जबाबदारी त्यांची असताना त्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. गळतीमुळे दोन्ही धरणातील पाणी वाया जात असून भाडणे येथील गट नं.५८४ या शेतजमिनीतून जाणाऱ्या मायनर चारी क्र.११ चे बांधकामही अपुर्ण ठेवण्यात आले आहे. बील मात्र पुर्ण काढले गेले आहे. त्यामुळेच धरणाची गळती थांबवून पाटचारीचे अपुर्ण काम पूर्ण करावे. जेणेकरून शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होईल, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या आंदोलनात प्रहार जनशक्ति पक्षाचे साक्री तालुका अध्यक्ष कैलास भदाणे,उपाध्यक्ष नानाजी शेलार,शशिकांत सूर्यवंशी, अॅड.कविता सूर्यवंशी, संजय सोनवणे, संजय सरग, राहुल गवळे, उमेश सोनवणे, राजेंद्र कोरडकर, शरद सोनवणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.