धुळे : पुढारी वृत्तसेवा
कुळ कायद्यासंदर्भात जमिनीचे वर्ग बदलाचे जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार परस्पर वापरल्याचा ठपका ठेवत शिंदखेडाचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा पदभार शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान सैंदाणे यांच्यावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई होत आहे.
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील गट क्रमांक 64 ही जमीन नियंत्रण सत्ता प्रकारातील वर्ग दोन मधील आहे. ही जमीन नवीन रेल्वे मार्गासाठी संपादित होणार आहे. त्यामुळे शिरपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी 19 जानेवारी 2022 रोजी जमीन हस्तांतरणास बंदीचे आदेश दिले. या आदेशाची नोंद त्याच दिवशी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी मंजूर केली. पण त्याच दिवशी ही जमीन दुय्यम निबंधक यांच्याकडे खरेदीने घेतली गेल्याचा प्रकार घडला. यानंतर कलमाडीच्या तलाठ्याने फेरफार नोंद देखील केली. या नोंदीवर हरकत घेतली. मात्र ही हरकत तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी फेटाळली. परिणामी मंडळ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील नोंद घेतली. त्यामुळे या प्रकाराची थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार झाली. त्यानंतर संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई झाली. या प्रकरणात विभागीय आयुक्त यांच्याकडे देखील तक्रार झाली. त्यानुसार तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी अधिकार नसताना नियंत्रण सत्ता प्रकारातील जमिनीचा भोगवटादार वर्ग करण्याचा निर्णय घेतला असा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी विभागीय आयुक्तांनी त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
त्यामुळे आता तहसीलदार सैंदाणे यांना निलंबित केले असून त्यांच्या निलंबनाच्या कालावधीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालय हे त्यांचे मुख्यालय राहणार आहे. दरम्यान तहसीलदार सुनील सैंदाणे यांना बागलान मतदारसंघाच्या आमदारांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडल्यामुळे 2017 मध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अशी माहिती देखील उपलब्ध झाली आहे. तहसीलदार सैंदाणे यांच्या जागी शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.