सातारा : हे तर यशवंतरावांच्या विचारांचे नव्हे तर प्रॉपर्टीचे वारसदार : आ. जयकुमार गोरे | पुढारी

सातारा : हे तर यशवंतरावांच्या विचारांचे नव्हे तर प्रॉपर्टीचे वारसदार : आ. जयकुमार गोरे

कराड; पुढारी वृत्तसेवा : गेल्या अडिच वर्षात जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांवर खूप मोठा अन्याय करण्यात आला. अनेकांना खूप संघर्ष करावा लागला. त्यांनी मलाही सोडले नाही. जिल्हाध्यक्ष झाल्यावर षडयंत्रे रचून माझा कार्यक्रम करायचा प्रयत्न केला. पण आता आपले सरकार आले आहे. आता चिंता आम्ही नाही तर कारखानावाल्यांनी करायची आहे. हे तर स्व. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे वारसदार नसून ते प्रॉपर्टीचे वारसदार आहेत. त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. भाजप कार्यकर्त्यांना यापुढे कुणीही त्रास द्यायचा विचारही करु नये, असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला. कराड उत्तर मतदार संघात कोपर्डे आणि उंब्रजमध्ये आयोजित भाजप संवाद यात्रेत ते बोलत होते.

कार्यक्रमाला भाजपा सचिव विक्रम पावसकर, कराड उत्तरचे नेते धैर्यशीलदादा कदम, महेशकुमार जाधव, महेंद्र डुबल, रामकृष्ण वेताळ, सागर शिवदास, अ‍ॅड. शेजवळ, शितल कुलकर्णी, रुपाली खोत, विलास आटोळे, चंद्रकांत मदने, सयाजी जाधव, जयवंत पडवळ, रामभाऊ घाडगे आणि भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. गोरे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त लोकांची सेवा करण्याचा संदेश दिला. म्हणूनच सेवा पंधरवड्यात देशभर रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य शिबिरे आणि वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मोदींनी राबवलेल्या शेतकरी, कष्टकरी, महिला, भगिनी, व्यावसायिक, युवक, युवतींसाठीच्या अनेक योजनांमुळे देशाचे चित्र पालटले आहे. या योजनांपासून जे कोणी वंचित आहेत त्यांना या पंधरवड्यात भाजपा कार्यकर्ते लाभ मिळवून देत आहेत. गावोगावी हर घर जल ही मोठी योजना राबवली जात आहे. भाजपचे कार्यकर्ते खूप संघर्ष करतात. पक्षवाढीसाठी कठोर परिश्रम करतात. त्यांना भेटून त्यांच्या अडचणी आम्ही दूर करतोय. कार्यकर्त्यांनी आता असुरक्षित समजायचे कारण नाही. त्यांच्या पाठीशी आपले सरकार आणि आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आता आपण थांबायचे नाही. आपला गाव, गण, गट आणि तालुका विकासात पुढे नेवून येणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. नव्या, जुन्यांचा मेळ घालून आपल्याला पक्ष संघटन वाढवायचे आहे. अधिकार्‍यांनीही आमच्या कार्यकर्त्यांच्या कामात आडकाठी आणू नये,असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, आ. गोरेंनी कोपर्डे हवेली येथील 95 वर्षांच्या आरएसएस, जनसेवा संघ, भाजपात कार्यरत असलेल्या रामचंद्र बापू चव्हाण यांचे आशिर्वाद घेतले. भाजपा सचिव विक्रम पावसकर यांनी पक्षाने देशात, राज्यात आणि मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती दिली.

Back to top button