धुळे, पुढारी वृत्तसेवा : मुंबई -आग्रा महामार्गावर ट्रक चालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या गुन्हेगाराच्या टोळक्याला अवघ्या बारा तासांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने मालेगाव येथून बेड्या ठोकल्या आहे. या टोळक्यातील दोघांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांनी महामार्गावर अशाच प्रकारची लूट केल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती घेतली जात असल्याचे पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी सांगितले.
सटाणा तालुक्यातील तळवाडे येथे राहणारे किरण मुरलीधर गायकवाड हे ट्रक घेऊन दोंडाईचा च्या दिशेने जात होते. यावेळी धुळे शहरालगत असणाऱ्या वरखेडे उड्डाणपुलाजवळ त्यांच्या ट्रकचे एक्सल खराब झाल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला. गायकवाड यांनी मेकॅनिकलला संपर्क केला. मात्र रात्री गाडी दुरुस्त होण्यास विलंब होणार असल्याचे पाहून गायकवाड यांनी गाडीतच झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते ट्रकमध्ये झोपले असता रात्री दोन वाजेच्या सुमारास ट्रकच्या केबिनमध्ये अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील अकरा हजार पाचशे रुपयांची रोकड आणि मोबाईल जबरीने काढून घेतला. यानंतर त्यांच्याकडील एटीएम कार्ड देखील या आरोपींनी हिसकावून घेतले. या गुन्हेगारांनी गायकवाड यांना मारहाण करून चाळीसगाव रोड भागातील एका एटीएम सेंटर मध्ये त्यांना पैसे काढण्यासाठी घेऊन गेले. मात्र हा प्रयत्न गुन्हेगारांच्या अंगाशी आला. यावेळी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाची गस्तीची गाडी एटीएम सेंटरकडे आली. त्यांनी एटीएमच्या बाहेर लक्ष ठेवणाऱ्या संशयिताला त्याचे नाव विचारले यावेळेस त्याने त्याचे नाव संतोष असल्याचे सांगितले. पण त्याच्या डोक्यावर गोल टोपी असल्यामुळे गाडीतील पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी या संशयित तरुणाला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू करताच आरोपींनी तेथून पलायन केले. मात्र पोलिसांनी शिताफीने अकबर शेख याला ताब्यात घेतले. यावेळी गायकवाड यांनी त्यांची कशाप्रकारे लूट झाली ही माहिती पोलिसांना दिली. या घटनेमुळे खळबळ उडाली. या संदर्भात आझादनगर पोलीस ठाण्यात भादवि कलम 395, 397 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास तातडीने सुरू केला. यावेळी तांत्रिक विश्लेषण केले असता हा गुन्हा मालेगाव येथील टोळक्याने केल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी तसेच कर्मचारी संदीप पाटील, प्रदीप पाटील, संदीप सरग, कुणाल पानपाटील, रवीकिरण राठोड, उमेश पाटील, चेतन कंखरे, विशाल पाटील, शोयब बेग यांनी मालेगाव येथे या गुन्हेगारांची माहिती गोळा करून सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे अल्ताफ खान कुरेशी, जुम्मन शाह, सुदर्शन वाणी आणि समीर पठाण असे असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तू तसेच रोकड आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या टोळक्यातील चौघांनी घटनास्थळावरून गुन्हा करून पळून जात असताना धुळे तालुक्यातील पुरमेपाडा जवळ आणखी एका ट्रक चालकाची लूट केली असल्याची बाब देखील पुढे आल्याची माहिती पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिली आहे. दरम्यान यातील दोघा आरोपींवर नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव आणि नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील लूटमार आणि दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याची माहितीदेखील प्राथमिक तपासात पुढे आली आहे.