उत्तर महाराष्ट्र

धुळे : शाई फेकप्रकरणी महिला सन्मान समितीचा मोर्चा

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत तटस्थ राहणाऱ्या महिला सदस्याच्या अंगावर शाईफेक केल्याच्या  घटनेचा निषेध करण्यासाठी महिला सन्मान आणि संरक्षण समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावून महिलांवर अशाप्रकारे हल्ला करण्याच्या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या विशेष सभेत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शालिनी बाळासाहेब भदाणे आणि अनिता प्रभाकर पाटील या दोन्ही सदस्य तटस्थ राहिल्या. त्यामुळे संतप्त शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, धीरज पाटील, महिला आघाडीचे हेमा नेमाडे यांनी सदस्या शालिनी भदाणे यांच्या वाहनावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेचे सोमवारी दि.17 तीव्र पडसाद उमटले. महिला सदस्यावर हल्ला केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये खासदार डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अश्विनी पाटील, बाळासाहेब भदाणे, प्रा. अरविंद जाधव ,रामकृष्ण खलाणे ,संग्राम पाटील, उत्कर्ष रवंदळे ,चंद्रजीत पाटील ,किशोर संघवी ,संजय शर्मा ,मनपा स्थायी समितीचे सभापती शीतलकुमार नवले, यांच्यासह शिंदे गटाचे मनोज मोरे, संजय वाल्हे ,संजय गुजराती , भाजपाच्या डॉ माधुरी बाफना, मायादेवी परदेशी ,माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्यासह महिला सन्मान व संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.

अग्रवाल विश्राम भावना पासून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील विविध रस्त्यांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासमोर महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ग्रामीण भागातील महीलांना पंचायतराज कायद्याने दिलेल्या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये राजकीय भूमिका निभावण्याची संधी मिळाली आहे. अशा परिस्थितीत महीला सदस्यांवर भ्याड हल्ले होणार असतील तर भविष्यात महीला राजकारणात कशा येतील?. अशा प्रकारचा हल्ला ही अत्यंत गंभीर बाब असुन, ग्रामीण भागातील महीलांसह सर्व स्तरातुन या घटनेच्या निषेधाची आपण गंभीर दखल घ्यावी. घटनेत असलेल्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तो पुरेसा नाही. हल्लेखोरांवर कठोर व तत्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. कारवाई न झाल्यास, ग्रामीण भागासह सर्वच स्तरातील महीला भविष्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यास सज्ज आहेत असा इशाराही निवदेनाव्दारे देण्यात आला.

दरम्यान यासंदर्भात पीडित सदस्या शालिनी भदाणे यांचे पती बाळासाहेब भदाने यांनी देखील संतप्त होत हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या गटाला गंभीर इशारा दिला आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करतांना नेहमी माणसे जोडण्याचा प्रयत्न केला आहे. विकासाचे राजकारण करत असतांना तालुक्यात विकासाचे माॅडेल उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. राज्यात राजकिय उलथापालथ होऊनही आज पर्यन्त कुठल्याही गटा-तटाच राजकारण न करता शिवसेनेच्या माध्यमातून बोरी पट्टयासह तालुक्याचा विकास करण्याचा ध्यास मनी धरला असल्याचे भदाने यांनी सांगितले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT