उत्तर महाराष्ट्र

धुळे : अवैध सावकारी करणाऱ्या चौघांना ठोकल्‍या बेड्या

अमृता चौगुले

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात अवैध सावकारी करणाऱ्या चौघांना आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. तर त्‍यांनी तक्रारदाराचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचे देखील प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे.

धुळ्यात इलेक्ट्रिक डेकोरेटर्सचा व्यवसाय करणारे मिनेश महेश्वर बोडस यांना धुळ्यातील प्रमोद काशिनाथ वाणी उर्फ आबा वाणी, जितेंद्र बाबुराव वाघ ,निलेश हराळ, नितीन उर्फ बबन मधुकर थोरात या चौघांनी व्याजाने पैसे दिले होते. या पैशांच्या मोबदल्यात जबरदस्तीने 10 ते 15 टक्के प्रति महिना व्याज आकारून या पैशांचे वेळोवेळी हप्ते तक्रारदाराकडून वसूल करण्यात आले. या पैशांची तक्रारदाराने पूर्ण परतफेड करून देखील चौघा सावकारांनी त्याच्याकडे पुन्हा पैसे घेणे आहे, असे सांगून त्याला त्रास देणे सुरु ठेवले होते. तर त्याच्या घरी जाऊन शिवीगाळ करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तक्रारदार यांच्या घराची बाजार मूल्य प्रमाणे कोट्यवधीची किंमत असताना देखील 10 ते 15 लाखांत ही मालमत्ता बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला.

तसेच, निलेश हरळने बोडस यांना दुचाकीवर बसवून धुळे तालुक्यातील चितोड परिसरात असणाऱ्या नंदा भवानी मंदिर परिसरात बेदम मारहाण केली होती. या सर्व त्रासाला कंटाळून बोडस यांनी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. त्‍यापुसार त्‍याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने या चौघांना अटक केली असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या संदर्भात पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी अवैध सावकारांनी विरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला. जनतेने अवैध सावकारांकडून आर्थिक शोषण व पिळवणूक झाली असल्यास यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेची संपर्क करण्याचे आवाहन त्‍यांनी केले आहे.

हेही वाचा   

SCROLL FOR NEXT