पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील जेबापूर शिवारातील साडेपाच एकर उसाला दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. यात शेतकऱ्यांचे सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले असुन सुदैवाने जीवितहानी टळली. आगीचे कारण समजू शकले नाही. सुकापूर येथील सयाजीराव भदाणे यांच्या शेतातील (गट क्र.१३२/१अ) दोन एकर ऊस, कल्पना भदाणे (गट क्र.१३२/१ ब) यांच्या शेतातील दोन एकर ऊस व कांतिलाल भदाणे (गट क्र.१३१/१ ब) यांच्या शेतातील दीड एकर ऊस, असा एकूण साडेपाच एकर ऊसाला अचानक आग लागली. (Dhule)
आग अचानक पसरल्याने शेतीमालक व ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. शेतकरी व उसतोडणी कामगार आरडाओरडा करू लागले मात्र, परिसरात सायंकाळी बिबट्याचा वावर व दहशत असल्याने मदतीला कोणीही धावून आले नाही. आग विझवण्यासाठी वीज नसल्याने विहिरींच्या पाण्याचाही उपयोग करता आला नसल्याने आगीने क्षणार्धात रूद्रावतार धारण करत दोन तासांत आग सर्वत्र ऊसांच्या शेतात पसरल्यामुळे सुमारे साडेपाच एकर ऊस जळुन खाक झाला. (Dhule)
शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच साडेपाच एकर ऊस जळुन खाक झाल्याने सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आगीबाबत शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून तलाठी अधिकाऱ्यांना माहिती दिली असून बिबट्याच्या दहशतीने आम्ही उद्या पंचनामासाठी येऊ, असे सांगितले. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Dhule)