उत्तर महाराष्ट्र

धुळे : दोंडाईचा जवळ अपघातात दोघांचा मृत्यू ; जखमी रात्रभर घटनास्थळावर होते पडून

गणेश सोनवणे

धुळे पुढारी वृत्तसेवा : दोंडाईचा जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा झालेल्या या अपघातानंतर दोघे जखमी घटनास्थळावरच पडून होते. या रस्त्यावर रहदारी नसल्याने जखमींना मदत मिळाली नाही. आज सकाळी पुलाजवळ मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

साक्री तालुक्यातील म्हसाळे येथे राहणारे लक्ष्मण नाना बेडसे हे गुजरात राज्यातील बारडोली येथे उद्योग व्यवसायासाठी स्थायिक झालेले आहेत. बारडोली येथे एका खाजगी कंपनीत ते काम करतात. शिंदखेडा तालुक्यातील रंजाणे येथे त्यांच्या भाचीचे लग्न होते. या लग्न समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी बेडसे हे त्यांच्या मित्रासंमवेत दुचाकीने गुजरात येथून नंदुरबार मार्गे दोंडाईचा येथे येत होते. त्यांची जीजे 19 बी एफ 1989 क्रमांकाची दुचाकी दोंडाईचापासून एक किमी अंतरावर आली.

यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने लक्ष्मण बेडसे आणि त्यांच्यासमवेत असणारे त्यांचे मित्र अनिल गोकुळ वासवा हे रस्त्यावरील लहान पुलाच्या रस्त्याच्या कडेला फेकले गेले. गंभीर जखमी अवस्थेत ते रात्रभर घटनास्थळा वरच पडून होते. या रस्त्यावर रात्री उशिरा फारशी रहदारी नसल्यामुळे हा प्रकार वाहनचालकांच्या देखील निदर्शनास आला नाही. मात्र सकाळी काही वाहनचालकांना दुचाकी अपघात ग्रस्त अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी पाहिले असता बेडसे व वासवा हे पुलाजवळ गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांना तातडीने दोंडाईचा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला झाल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT