उत्तर महाराष्ट्र

धुळे : लावण्याला न्याय मिळण्यासाठी विद्यार्थी परिषदेचे शहिद स्मारकासमाेर निदर्शने

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा : तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील ख्रिश्चन मिशनरी संस्थेत शिक्षण घेत असलेल्या लावण्याला धर्मांतराच्या दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा संशय आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दाेषींविरूध्द कठाेर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली.  या मागणीसाठी संताेषी माता चाैकातील शहिद स्मारकासमाेर विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली.

तामीळनाडूतील तंजावर येथे ख्रिश्चन मिशनरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या लावण्या या विद्यार्थिनीला ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करण्याच्या दबावामुळे आत्महत्या करावी लागली, असा आरोप करीत, ही संस्थात्मक हत्या भारतीय संविधान आणि लोकशाहीला काळीमा फासणारी असून अशा प्रकारे असंख्य निष्पापांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. परंतु अद्यापही येथील सरकारने अपराध्यांवर कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याचे अभाविप कार्यकर्ते म्हणाले.

लावण्याला न्याय मिळावा यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्री निधि त्रिपाठी चेन्नई येथे शांततापूर्वक आंदोलन करीत होत्या. परंतु तेथील सरकारने त्यांना अटक केली. त्यांच्यासह अभाविपच्या ३३ कार्यकर्त्यांना १४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कृत्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जाहीर निषेध करते. लावण्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थी परिषद लढत राहिल, असा इशारा यावेळी अभाविप कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी देवगिरी प्रांत सहमंत्री भावेश भदाणे, वैभवी धिवरे, राजेंद्र पाटील, उदय महाजन योगेश कोल्वाले, मयूर साकोरकर, हर्षल पिंगळे, चेतन बद्गुजर, हर्ष अग्रवाल, ओमकार प्रजपत, भावेश जाधव उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT