ना. डॉ. भागवत कराड,www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

अर्थसंकल्प राजकारणापलीकडचा, त्यातून 25 वर्षांच्या भविष्याचा वेध : ना. डॉ. भागवत कराड

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या देश 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करीत आहे. त्यामुळे पुढच्या 25 वर्षांत म्हणजेच 2047 मध्ये देशातील काळ कसा असेल याचा वेध घेऊन यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प राजकारणापलीकडचा असून, पाच राज्यांच्या निवडणुकींच्या दृष्टीने नव्हे तर देशाचे हित लक्षात घेऊन सादर केला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
यांनी केले.

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टस् ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, आ. सीमा हिरे, सीए असोसिएशनचे चेअरमन सोहिल शहा, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, भाजप नेते लक्ष्मण सावजी, इंडियन आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सचिव आशिष नहार, क्रेडाईचे अध्यक्ष रवि महाजन, महाराष्ट्र चेंबर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, सतीश कोठारी, शशिकांत शेट्टी आदी उपस्थित होते.

पुढे ना. कराड म्हणाले की, 'देशात ओमायक्रॉनची लाट असताना अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. तरीही प्रत्येक क्षेत्रात भरीव तरतूद करण्यावर भर दिला आहे. देशाचा जीडीपी वाढत आहे. यंदा 39 लाख 45 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षी 34 लाख 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प होता. म्हणजेच देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे. सध्या देशाचा जीडीपी 9 टक्के असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक पातळीवर विचार केल्यास, जगाचा जीडीपी 4.4 टक्के आहे. त्या तुलनेत भारत झपाट्याने विकसित होणारा देश म्हणून पुढे येत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी आरोग्य, शिक्षण तसेच पायाभूत सुविधांमध्ये रोड, रेल्वे, वॉटरबेस, स्पोर्ट, एअरपोर्ट, मास ट्रान्स्पोर्ट यावरदेखील मोठी तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पीएम ग्रामसडक योजन तसेच पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची तरतूद केली आहे. पोस्ट कार्यालये, क्रिप्टो करन्सी, डिजिटल करन्सी, संरक्षण यासह सर्वच क्षेत्रात मोठी तरतूद केलेली असल्याने, देशाचा भविष्काळ उज्ज्वल असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी शहरातील विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ
देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचे सांगताना ना. कराड म्हणाले की, 'नोव्हेंबर 2021 मध्ये देशाचा जीएसटी 1 लाख 30 हजार कोटी इतका होता. डिसेंबरमध्ये हा आकडा 1 लाख 31 हजार कोटी झाला. तर जानेवारी 2022 मध्ये 1 लाख 40 हजार कोटींवर हा आकडा गेल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींमुळे अर्थव्यवस्था रुळावर
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावर आल्याचेही त्यांनी सांगितले. 2014 पूर्वी देशाचा अर्थसंकल्प 16 लाख कोटी इतका होता. आज तो 30 लाख 45 हजार कोटींवर गेला आहे. गेल्या 7 वर्षांत दुपटीपेक्षा अधिक अर्थव्यवस्था वाढल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच थेट 2008-09 मध्ये थेट परदेशी गुंतवणूक 8.03 टक्के इतकी होती. 2021-22 मध्ये 80.01 टक्के असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT