इगतपुरी : नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडावर चढाई करताना गिर्यारोहक.  
उत्तर महाराष्ट्र

हरिश्चंद्र गडाची चढाई : माकड नाळेने पायउतार; घोटीच्या कळसूबाई मंडळाचा धाडसी ट्रेक

अंजली राऊत

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
घोटी येथील प्रसिद्ध कळसूबाई गिर्यारोहक मित्र मंडळाने हरिश्चंद्र गडाची नळीच्या वाटेने यशस्वी चढाई केली. अवघड वाट माकड नाळेने गिर्यारोहक पायउतार झाले. त्यांच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.

गिर्यारोहकांचे नंदनवन असलेला ठाणे, अहमदनगर, पुणे या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील बेलाग हरिश्चंद्रगडावर चढाई करण्यासाठी जवळपास सोळा वाटा आहेत. त्यापैकी अवघड श्रेणीतील अतिशय दुर्लक्षित, दुर्गम भागातून जाणार्‍या अंतर्वक्र दोन वाटा म्हणजे एक नळीची वाट आणि दुसरी माकड नाळ आहे. कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी हरिश्चंद्रगडाच्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या कोकणकड्याच्या पायथ्याशी असलेल्या मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटालगत आदिवासी बैलपाडा येथून अतिशय खडतर नळीच्या वाटेने कोकणकड्याच्या डाव्या बाजूने हरिश्चंद्रगडावर चढाई केली. तसेच गडावर असलेल्या हरिश्चंद्रेश्वराचे पाण्यात असलेले केदार लिंग, गणपतीचे दर्शन घेतले. गुहांचा समूह, थंड पाण्याच्या पुष्करण्या तसेच तारामतीच्या उंच शिखरावरून कळसूबाई शिखर, अलंग, मदन, कुलंग, कुंजरगड व नैसर्गिक वातावरणाचा आनंद गिर्‍हारोहकांनी घेतला. या उपक्रमात कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, गजानन चव्हाण, बाळू आरोटे, अशोक हेमके, नीलेश पवार, प्रवीण भटाटे, ज्ञानेश्वर मांडे, नामदेव जोशी, सोमनाथ भगत, उमेश दिवाकर, संतोष म्हसणे, कमळू पोकळे आदी सहभागी झाले होते.

तेरा तासांत चढल्या दोन अवघड वाटा
कोकण कड्याला वळसा घालून डाव्या बाजूने असलेल्या माकड नाळेने उतराई केली. एकाच दिवसात म्हणजे 13 तासांत या गिर्यारोहकांनी दोन अवघड वाटा चढून उतरण्याचा विक्रमच नोंदविला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार आतापर्यंत प्रथमच हा विक्रम कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी केला आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT