उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या कलावंतांना मिळाले व्यासपीठ

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्य अभिनेता व अभिनेत्रीपासून तर दिग्दर्शक, संगीतकार आणि निर्माते आदींपर्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडत नाशिकच्या कलावंतांनी 'जैतर' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या १४ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'जैतर'निमित्त नाशिकच्या कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळून चित्रपटसृष्टीत रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

'जैतर' ही एका विद्यार्थी दशेतील प्रेमीयुगुलाची, मालेगावात घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित गोष्ट आहे. जाती, वर्ण, आर्थिकस्तर आदी गोष्टींवरून समाजात अनेक स्तर निर्माण होतात, भेदाभेद होतात. त्याचे पडसाद अनेकदा प्रेमप्रकरणात किंवा लग्नादरम्यान उमटून संघर्ष निर्माण होतो. परंतु, बऱ्याचदा त्या संघर्षाची मोठी किंमत ही स्त्रियांना मोठ्या प्रमाणात चुकवावी लागते. चित्रपटाचे कथालेखक आणि निर्माते मोहन घोंगडे हे मूळ शेती व्यावसायिक आहेत. मालेगावात प्रेमप्रकरणावरून घडलेल्या 'त्या' सत्यघटनेत त्यांना एक गंभीर समस्या दिसली. त्या समस्येला वाचा फोडण्यासाठी त्यांनी ही कथा लिहिली. चित्रपटाची पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन घन:श्याम पवार यांचे आहे. कथानकाची गरज ओळखून खानदेशात चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाला आगळा खानदेशी स्पर्श लाभला आहे. ह्या सिनेमात रजत गवळी आणि सायली पाटील हे नवोदित कलाकार प्रमुख भूमिकेत असून गणेश सरकटे, गायत्री सोहम, अविनाश पोळ, रामेश्वर डापसे, अरुण गिते, स्मिता प्रभू, जीवन महिरे तसेच संग्राम साळवी यांच्यासह इतर कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT