बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : तू चाल पुढे, तुला रंगड्या भीती कशाची… पर्वा बी कुणाची… हे स्फूर्तीगीत अनेकांनी ऐकले असेल, पण फारच कमी जण त्यावर अंमल करतात. एका बेळगावकर दाम्पत्याने त्यावर फक्त अंमलच केलेला नाही, तर थेट इंडिया बुक ऑफ रेकार्डस्पर्यंत मजल मारली आहे. राहुल आणि स्नेहल मंगणावर हे ते दाम्पत्य. त्यांनी ३० दिवसांत दुचाकीवरून ९,७५२ किमी अंतर कापण्याचा विक्रम केला आहे. म्हणजे रोज सरासरी ३०० किमी. याआधीचा विक्रम ९ हजार किमीचा होता.
मूळचे शिंदोळीचे हे दाम्पत्य टिळकवाडीत राहते. राहुल व स्नेहल यांनी सीएनजी या इंधनाच्या वापराच्या जागृतीसाठी बेळगाव ते काश्मीरला लागून असलेली पाकिस्तान सीमा असा प्रवास केला. त्यांनी ३० दिवसांत चक्क ९,७५२ किलोमीटरचे अंतर कापले. दाम्पत्याने केलेल्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली असून त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे.
याआधी दाम्पत्याने दुचाकीवरून सलग अंतर कापण्याचा भारतीय विक्रम ९ हजार किमीचा होता. तो या दाम्पत्याने मोडला. मे २०२२ मध्ये त्यांनी दुचाकीवरून बेळगाव ते हिमालयातील तुर्तक, खदुंगला या ठिकाणपर्यंत प्रवास केला. खर्दुगला हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १९, ९०० फूट इतके उंच आहे.
गतवर्षी त्यांनी केलेला हा विक्रम यंदाच्या इंडिया बुकमध्ये नोंदवला गेला आहे. गेल्या १ मार्च रोजी त्यांना विक्रमाचे नोंदणीपत्र देऊन गौरवण्यात आले. राहुल अभियंता असून सध्या एमसीएल या नैसर्गिक गॅस निर्मिती कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी नैसर्गिक गॅसबाबत जागृती केली आहे. १ मार्च २०२३ रोजी त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्कडून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.