Unauthorized Schools Pudhari
अहिल्यानगर

ZP School Teacher Surplus: झेडपी शाळांमध्ये पटसंख्या घट; 650 शिक्षक अतिरिक्त, भविष्यात अडचण वाढण्याची शक्यता

शासकीय शाळांची गुणवत्ता सुधारली असली तरी प्रवेश कमी; शिक्षकांनी पालकांपर्यंत पोहोचण्याची गरज अधोरेखित

पुढारी वृत्तसेवा

नगर: गेल्या काही वर्षांपासून झेडपी शाळांतील पटसंख्या कमी होत असल्याने दर वर्षी शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. गेल्या तीन समायोजनांमध्ये तब्बल 650 शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. मात्र हीच परिस्थिती कायम सुरू राहिल्यास हजारो शिक्षक अतिरीक्त होऊन, त्यांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे. गत पाच वर्षांत पटसंख्या कमी झाल्याने बिंदू नामावलीनुसार 364 पदेही कमी झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नोकरी टिकवण्यासाठी गुरुजींना आता आपापल्या शाळांची पटसंख्या आणि त्याकरिता पालकांची विश्वासार्हता वाढवणेही गरजेचे असणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि शिक्षकांना विश्वासात घेऊन, जिल्हा परिषदेची शाळेची गुणवत्ता वाढवून दाखवली आहे. मात्र, ती पालकांपर्यंत पोहचतच नसल्याने आजही अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश हे खासगी शाळेत होताना दिसत आहेत. झेडपीची शाळा म्हटलं की शाळा खोल्यांची अवस्था, भौतिक सुविधांची कमतरता, गुरुजी शिकवतच नसल्याची नाहक होणारी चर्चा, यामुळे पालकांचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा तसा दृष्टिकोन बनला आहे. मात्र, आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बेंच आहेत. खेळायला मैदान आहे, अनेक ठिकाणी वाचनालये, प्रयोगशाळाही उभारल्या जात आहेत. मोफत पुस्तके, गणवेशही दिला जात आहे.

दररोज पोषण आहार आहे. शिकायला डिजीटल उपकरणे आहेत, त्यामुळे अशा भौतिक सुविधाच नाही तर गुणवत्तेतही आज झेडपीचीच पोरं झळकताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात खासगीपेक्षा झेडपीचीचं पोर झळकल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे आता पालकांचाही जिल्हा परिषद शाळांविषयी दृष्टिकोन बदलू लागला आहे. यात शिक्षकांनीही दोन पावले उचलून, आपल्या शाळेची गुणवत्ता, वाढती पटसंख्या पालकांसमोर मांडणे गरजेचे आहे. पालक मेळावे, नवागत विद्यार्थ्यांच्या घरी भेटी, वेगवेगळे उपक्रम राबवून आणखी जबाबदारी घेण्याची गरज आहे. यातून पट वाढणार आहे.

अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढतेय

संच मान्यतेनुसार 2025-26 मध्ये 239 शिक्षक अतिरिक्त ठरले होते. शिक्षण विभागाने पदोन्नतीची प्रक्रिया केल्याने त्यांचे समायोजन शक्य आले, अन्यथा त्यांना ‌‘बाहेर‌’ पडावे लागले असते. मात्र, पटसंख्या कमी कमी होत असल्याने दर वर्षी अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढती आहे, तर रिक्त जागांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अतिरीक्त शिक्षक अधिक होत असल्याने अनेकांची अडचण वाढणार आहे.

तुमच्या शाळेतही ‌‘संवत्सर‌’ पॅटर्न का नाही?

जिल्ह्यातील संवत्सर ही शाळा आज राज्यात चर्चेत आली आहे. शिक्षण समितीचे माजी सभापती राजेश परजणे यांच्या मार्गदर्शनात येथील नऊ शाळांमध्ये सुटीतही विद्यार्थ्यांचे वर्ग सुरूच आहेत. नुकतेच तिसरी आणि सहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची तयारी सुरू केली आहे. याकामी शिक्षकांचे योगदान कौतुकास्पद आहे. त्यांनी आपली सुटी विसरून केवळ आपले विद्यार्थी आणि शाळेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळेच संवत्सरचा गतवर्षीचा शिष्यवृत्तीचा निकाल डोळे दिपवणारा ठरला. आजही अनेक पालकांनी संवत्सर येथील शाळेत प्रवेश घेण्यासाठी आपल्या पाहुण्यांकडे मुले आणून सोडली आहेत. इतकी विश्वासाहर्ता सर्व शाळांची झाली तर.., असेही वाटत आहे. विशेष म्हणजे संवत्सर शाळेत पटसंख्या वाढती असल्याने शिक्षक संख्याही वाढती आहे, अतिरिक्त नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT