

नगर: वादळी पावसाने रविवारी रात्री अहिल्यानगर शहराला तडाखा दिला. पावसाआधी सुटलेल्या वादळी वाऱ्याने शहर आणि उपनगरांत दाणादाण उडवली. सुमारे 40 ठिकाणी झाडे पडली. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले. दुसरीकडे वीजवाहक तारांवर झाडे पडल्याने रात्रभर वीज गायब होती. त्यामुळे असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले. दरम्यान, महापालिकेच्या पथकांची झाडे हटविण्याची मोहीम रात्रीपासून सोमवारी दिवसभर सुरू होती.
शहरात रविवारी (31 मे) रोजी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये झाडे उन्मळून पडली. विद्युत तारा तुटल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले. राधाबाई काळे कॉलेज रोड, जुनी मनपा परिसर, अशोका हॉटेल ब्रीजजवळील पेट्रोलपंपासमोर, रामवाडी, नशीबन कॉलनी रोड, समर्थनगर, वृंदावन कॉलनी, पारिजात चौक, पाईपलाईन रोड (यशोदानगर), झरेकर गल्ली, आयुर्वेद महाविद्यालय परिसर, भिस्त गल्ली, भाऊसाहेब फिरोदिया गेटसमोर, सर्जेपुरा रंगभवन परिसर, अमरधाम, समर्थ शाळा परिसर, हॉटेल सायंतारा परिसर तसेच सिद्धीदाता कॉलनी (प्रोफेसर चौक) या ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे रस्ते वाहतुकीस बंद होते. काही ठिकाणी झाडे थेट विद्युत तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत महापालिकेचा आपत्कालीन मोबाईल क्रमांक खणाणत होता. अग्निशामक विभाग, उद्यान विभाग, विद्युत विभाग व अन्य संबंधित आपत्कालीन यंत्रणांची पथके रात्रीपासून कामाला लागली होती. काही काम सोमवारी दुपारपर्यंत सुरू होते.
महावितरणचा फोन फक्त वाजतोय
वादळी पावसाने रविवारी रात्रभर शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होता. नागरिक महावितरणच्या सावेडी उपकार्यालयात सतत फोन करीत होते. तसेच, कर्मचाऱ्यांनाही फोन करीत होते. मात्र, कोणीही फोन उचलत नव्हते. अनेक ठिकाणी किरकोळ अडचणीमुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित राहिला. त्यामुळे नागरिकांना असह्य उकाड्यामुळे रात्र जागून काढावी लागली. महावितरणकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दुपारनंतर अनेक भागात वीजपुरवठा सुरळीत झाला.
वीजपुरवठा 90 टक्के सुरळीत
सोमवारी रात्रीपर्यंत शहरातील वीजपुरवठा जवळपास 90 टक्के सुरळीत झाला आहे. सध्या अशोका आणि दरेवाडी फिडरचे काम सुरू असून रात्रीतून ते दुरुस्त होईल असे महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.
सावेडी उपनगरात हाहाकार
रविवारी रात्री नऊच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने उपनगरात चांगली दाणादाण उडाली. पावसामुळे विजेचे खांब पडल्याने तसेच रस्त्यावरील फ्लेक्स बोर्ड, तसेच सावेडी नाक्याजवळील पत्र्याचे कंपाउंड उखडून पडले. मिस्किन मळा येथे मोठे झाड रस्त्यावर पडले होते.