नगर : एकीकडे जिल्हा परिषद प्रशासन गतीमान होत असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे महत्वाच्या आदेशाच्या फाईलींचा प्रवास मात्र कासवगतीने सुरू आहे. एक गटशिक्षणाधिकारी 15 दिवसांच्या रजेवर गेले, 15 दिवसांनी ते परत हजरही झाले, त्यानंतर कुठे पाच दिवसांनी रजा मंजुरी आणि अतिरीक्त कार्यभार सोपविण्याचे आदेश करणारी ती फाईल सीईओंपर्यंत पोहचली. त्यामुळे अक्षरशः काल 20 तारखेला किमान 20 दिवस उशीराने त्या आदेशावर सीईओंची डिजीटल स्वाक्षरी झाल्याचे दिसले.
सीईओंची दि. 20 जानेवारी रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, नेवाशाच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी या दि. 1 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत अर्जित रजेवर आहेत. प्रशासकीय कामाच्या सोयीच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरुपात त्यांचा पदभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपविणे आवश्यक आहे. त्यामुळे सामलेटी ह्या रजेवरून हजर होईपर्यंत विस्तार अधिकारी संजय कळमकर यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार सोपविण्यात येत आहे. मूळ कामकाज पाहून ही जबाबदारी सांभाळावी.
दरम्यान, सामलेटी ह्या 1 जानेवारीपासून रजेवर जाणार असल्याने त्यापूर्वीच प्रभारी जबाबदारी देण्याबाबतचा सीईओंचा आदेश अपेक्षित होता. मात्र सामलेटी ह्या रजेवर गेल्या, परत आल्या, या कालावधीत कळमकर यांनी चांगल्याप्रकारे जबाबदारीही सांभाळली, त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे नुकताच दि.20 जानेवारी रोजी सीईओंपर्यंत ही फाईल पोहचली आणि त्यानंतर त्यावर स्वाक्षरी झाली. दप्तर दिरंगाई, गैरवर्तन याबाबत धडे देणाऱ्या शिक्षण विभागाचा कासवगतीने सीईओपर्यंत पोहचलेला हा आदेश प्रशासकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला.