Jamkhed News: तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरे खरेदीसाठी येणार्या गोरगरीब शेतकऱ्यांना स्थानिकांची होणारी दादागिरी, कत्तलीसाठी होणारी गोवंश खरेदी, या सर्व बाबींकडे बाजार समितीने लक्ष न दिल्यास हिंदू समाजाचा मोर्चा समितीवर काढण्याचा इशारा पशु मानदचे अधिकारी शिवशंकर स्वामी व श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान तालुका प्रमुख पांडुराजे भोसले यांनी दिला.
जामखेड येथे दर शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांचा आठवडे बाजार भरतो. यावेळी अनेक व्यापारी मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी-विक्री करतात. राज्य सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा देऊनही मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलीसाठी खरेदी केली जातात. यावेळी अनेक व्यापारी दलाली घेऊन कसयांना मदत करताना आढळून येत आहे.
गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाताना पकडले जातात तेंव्हा बाजार समितीच्या खोट्या पावत्या दाखविल्या जातात, हा सर्व भोंगळ कारभार जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक वर्षांपासू चालू आहे. याकडे समितीच्या पदाधिकारी व अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवशंकर स्वामी व भोसले यांनी दिला.
अलिकडेच जामखेड बैल बाजारात शेतकरी माहिती व सल्ला केंद्रीच्या जुन्या कार्यालयात वीस ते पंचवीस जनावरे डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले. यावेळी जामखेड पोलिसांनी हे गोवंश ताब्यात घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून सर्व गोवंश अरणगावच्या वनश्री गोशाळेत देखभालीसाठी पाठविली.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, समितीच्या आवारात बाजर संपून दोन दिवस उलटून गेले तरी वीस ते पंचवीस गोवंश चारापाण्याविना कार्यालयात डांबून ठेवली आहेत. याकडे कोणाचेही लक्ष जात नाही, ही चिंतेची बाब आहे. याबात बाजार समिती व सहायक निबंधकांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे निवेदन देण्यात आले आहे.