छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा : एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारी अग्रीम रक्कम आणि दिवाळी भेट गुरुवार (दि.३१) पर्यंत मिळाली नाही. पुढही मिळण्याची शक्यता धूसर असल्याने यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे.
दरवर्षी एसटी कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांची अग्रीम उचल व ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येते. कर्मचाऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी दिवाळीपूर्वीच अग्रीम रक्कम आणि दिवाळी भेट देण्यात येते. परंतु यावर्षी दिवाळी सुरू झाली तरी गुरुवारपर्यंत यावर निर्णय झाला नाही. रविवारी भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह विविध एसटीच्या संघटनांत नाराजी पसरली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात सुमारे २ हजार ८०० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी अग्रीम उचल व दिवाळी भेटीसाठी सुमारे ५ कोटींची रक्कम विभागासाठी येत असते. यातील एकही रुपया अद्याप आला नसल्याने कर्मचाऱ्यांना दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे.