अहिल्यानगर : नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पांतर्गत वांबोरी ते राहुरी या 13.21 किलोमीटर अंतराची यशस्वी चाचणी बुधवारी (दि. 24) घेण्यात आली. येत्या काही कालावधीमध्ये नगर-मनमाड हे काम पूर्ण होणार असून, एकूण 147 किमी अंतराची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्य अभियंता (बांधकाम) सागर चौधरी यांनी दिली आहे. (Latest Ahilyanagar News)
या वेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी ए. के. पांडे, मुख्य अभियंता बी. के. सिंह, सहायक कार्यकारी अभियंता राजनारायण सैनी, सेक्शन इंजिनिअर धर्मेंद्र कुमार, एस. के. सिंह, सुद्धांसू कुमार, आर. डी. सिंह, प्रगती पटेल, राकेश कुमार, परशुराम राठौड़, धम्मरत्न संसारे आदी उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा, बेलापूर ते पढेगाव, निंबळक ते वांबोरी, पुणतांबा ते कान्हेगाव, पढेगाव ते राहुरी या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता बुधवारी (दि. 24) 13.21 किमी मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता एकूण 147 किमी अंतराची चाचणी घेतल्याचे चौधरी यांनी सांगितले.
मनमाड ते दौंड रेल्वेमार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो. मात्र, हा मार्ग एकेरी असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता, तसेच सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासोन्तास रेल्वे गाडी एकाच जागेवर थांबुन ठेवावी लागत. मात्र, आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाड्यांचा थांबा आता बंद होणार आहे.
या द्रुतगती रेल्वेमार्गावर मुळा नदीवरील लांबी 200 मीटर व उंची 21 मीटर असलेला सर्वांत मोठा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ओपन वेब गल्डर लावण्यात आला आहे. नगर ते मनमाड रेल्वे द्रुतगती मार्गामधील सर्वात मोठ्या लांबीचा व उंचीचा दुसरा पूल असून, या पुलामुळे रेल्वे गाड्या धावण्यासाठी बळकटी मिळाली आहे.
या कामामुळे रेल्वे ताशी 125 प्रति किमी वेगाने धावणार असल्याने, रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंडपर्यंत काम पूर्ण होणार आहे.