

नगर: प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या नाशिक परिमंडळात उत्तम प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत अहिल्यानगर मंडळातील 9 हजार 113 ग्राहकांनी 30.91 मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा छतावर बसवली आहे.
महिनाभरात तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. (Latest Ahilyanagar News)
अहिल्यानगर मंडळ अंतर्गत अहिल्यानगर ग्रामीण विभागात एकूण 879 ग्राहक, अहिल्यानगर शहर विभागात 4 हजार 89 ग्राहक, कर्जत विभागात 281 ग्राहक, संगमनेर विभागात 2 हजार 486 ग्राहक तर श्रीरामपूर विभागात 1 हजार 378 अशा एकूण 9 हजार 113 ग्राहकांची सौर यंत्रणा स्थापित झाली आहे.
रूफ टॉप सोलर उभारणाऱ्या ग्राहकांना आवश्यक असणारे नेट मीटर सुद्धा मोफत लावण्यात येत असून त्याचप्रमाणे 10 किलोवॅट पर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज सुद्धा उपलब्ध आहे.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीतील सेवा पर्वात महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे अभियान राबविण्यात येत असून, वीज ग्राहकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन अहिल्यानगर मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांनी केले आहे.
एक किलोवॅट प्रकल्पाला 30 हजार रुपये
रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला 30 हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला 60 हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला 78 हजार रुपये अनुदान मिळते. हाउसिंग सोसायट्यांनाही 500 किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट 18 हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिना अंदाजे 120 युनिट वीजनिर्मिती होते.