

पाथर्डी : तालुक्यातील शिरसाटवाडी येथील बिबेआंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आता धोकादायक स्थितीत आला आहे. तलावाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले असून, त्यातून पाणी वाहत आहे. हे भगदाड दिवसेंदिवस वाढत असून, कधीही भिंत पाण्याच्या दाबाने कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. तलाव फुटल्यास येथील शिरसाटवाडी, तसेच शहरालाही मोठा धोका संभवतो. या भीषण परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून, त्यासाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. (Latest Ahilyanagar News)
गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व नाले, ओढे, बंधारे व तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत बिबेआंबे तलावाची भिंत धोकादायक ठरली आहे. तलावाची प्रचंड पाणीसाठवण क्षमता लक्षात घेता जर भिंत फुटली तर प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर पडून मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी स्वखर्चाने व स्वतःच्या ताकदीवर दगडे टाकून भगदाड बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कामासाठी प्रचंड यंत्रसामग्री व मोठ्या शक्तीची आवश्यकता असल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने याकडे तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या तलावाची पाहणी दहा दिवसांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी केली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
परिणामी तलाव आणखी धोकादायक स्थितीत गेला आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने ग्रामस्थ अख्खी रात्र जागून काढत असून, प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रशासनाला आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आंदोलनात अविनाश पालवे, गोरक्ष मामू शिरसाट, ॲड. अक्षय शिरसाट, संजय शिरसाट, जनार्दन शिरसाट, विष्णू शेकडे, देविदास शिरसाट, नारायण शेकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.---पाथर्डी : तहसील कार्यालयात शिरसाटवाडी ग्रामस्थांनी ठिय्या मांडत तलावाच्या भिंतीची दुरुस्तीची मागणी केली. दुसऱ्या छायाचित्रात बिबेअंबा तलावाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडीमध्ये ग्रामस्थांनी माती व दगड टाकून बुजवण्याचा प्रयत्न केला.