पुणतांबा: राहाता तालुक्यातील वाकडी येथील जाधव-पानसरे वस्ती परिसरात काल रविवारी (दि.२२) पहाटे बिबट्याने गोठ्यावर हल्ला करून सहा शेळ्या ठार केल्या. या घटनेत शेतकरी दिगंबर जाधव यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला असून, शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
वाकडी शिवारातील जाधव-पानसरे वस्ती परिसरात दिगंबर जाधव यांचा शेळीपालनाचा गोठा आहे. शेळीपालनाच्या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी पहाटेच्या सुमारास परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला. त्यानंतर बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविला.
या हल्ल्यात गोठ्यातील सहा शेळ्या जागीच ठार झाल्या. पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी गोठ्यातील शेळ्या मृतावस्थेत आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी घटनास्थळी जमा झाले. याबाबत कोपरगाव वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनरक्षक सविता थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वनविभागाच्या वतीने मृत शेळ्यांची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. शेळीपालनासाठी केलेली गुंतवणूक आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
त्यामुळे अचानक झालेल्या या नुकसानीचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसला आहे. वनविभागाने पंचनामा केला असून, नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. वाकडी शिवारात मागील वर्षभरापासून बिबट्याचा वावर वाढल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरात पाळीव जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच मनुष्यांवरही हल्ल्याच्या घटना घडल्याने शेतकरी, महिला आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतातील कामांसाठी पहाटे किंवा रात्री बाहेर पडताना नागरिकांना बिबट्याच्या हल्ल्याची भीती सतावत आहे.
मानवी जीविताला धोका
शेतीच्या कामांसाठी रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे. पशुधनाचे नुकसान होण्याबरोबरच मानवी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने वनविभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. वाकडी शिवारातील बिबट्याचा वावर लक्षात घेता वनविभागाने संवेदनशील ठिकाणाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे बसवावेत. तसेच रात्रीची गस्त वाढवून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.