टाकळीभान: श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील अवैध धंदे व दारू विक्री रोखण्यासाठी महिलांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. ग्रामसभेत या महिलांनी कारवाईची मागणी केली, प्रशासनाला निवेदन दिले. त्यानंतर भरारी पथकाव्दारे भोकरमध्ये कारवाया सुरू झाल्याचे दिसते आहे.
भोकरच्या महिलांनी यापुर्वीही अनेकदा आमदार, तहसीलदार, पोलिस ठाणे, दारूबंदी व उत्पादन शुल्क कार्यालयावर दारूबंदीसाठी मोर्चा काढून दारुबंदी करण्याची मागणी केली. या दरम्यान, आमदार हेमंत ओगले यांनी आठवडा भरात दारूबंदी करण्याचे आश्वासन देवून प्रशासनाला सुचना दिल्या, तर पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांनीही त्वरीत कारवाई करण्याचे आश्वासन महिलांना दिले. (Latest Ahilyanagar News)
तत्पूर्वी, भोकर येथे दारुमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी सोमवार दि. 8 सप्टेंबर रोजी एकत्र येत ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजुर केला. त्यानंतर तालुक्यातील विविध कार्यालयात निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी सरपंच शितल पटारे, आशांकुर महिला केंद्राच्या सिस्टर प्रिस्का यांच्यासह आदी महिला एकवटलेल्या दिसल्या.
भोकर येथे जिल्हा परिषद शाळेसमोर अवैध दारू विक्री व मटका सुरु आहे, तो तत्काळ बंद करावा. व्यसनाधिनतेचा परिणाम शाळकरी मुलावर व अनेकांच्या संसारावर होत आहे तरी तात्काळ दारूबंदी करुन महिला वर्गाला दिलासा द्यावा, असे निवेदनात नमुद केले आहे.
निवेदन देताना उपसरपंच संदिप गांधले, रेखा थोरात, सुनिता आहेर, सुदाम पटारे, प्रताप पटारे उपस्थित होते. या निवेदनावर साखरबाई शिंदे, शिला अमोलीक, अनिता शिरसाठ, सुशिला सोनावणे, सुनिता थोरात, चंद्रकला म्हसे, उषा बोधक, शबाना शेख, विमल आहेर, ताराबाई पंडीत, पुजा अमोलीक, छाया साळवे, सोनाली चिलघर, कमल अमोलीक, सुमन अमोलीक, मंदा मोरे, शिला अमोलीक, आशा आहेर, चंद्रभागा आहेर, मनिषा अमोलीक,कमल साळवे, आशा चव्हाण, सुनिता आहेर आदि महिलांच्या सह्या आहेत.
पथकाच्या हातात रिकाम्या बाटल्या
महिलांनी निवेदन देताच भरारी पथकाने तातडीने भोकर येथे कारवाई सुरू केली, मात्र दारू विक्रेत्यांची यंत्रणाही मजबूत असल्याने त्यांना कारवाईची भणक लागली. त्यामुळे ते सावध झाल्याने पथकाला या ठिकाणाहून दोन गोण्या रिकाम्या बाटल्या शिवाय दुसरे काहीही हाती लागले नाही.
भोकरमधे एकुण 28 दारू विक्रीचे अड्डे आहेत. या विक्रेत्यांच्या नावांची यादी संबधित महिलांनी पोलिसांना दिली आहे. एकाच गावात अशाप्रकारे 28 दारू अड्डे असू शकतात, हे भोकरच्या प्रकरणावरून समोर आले आहे. आता पोलिस प्रशासन या बाबत काय भुमिका घेणार, याकङे नागरिकांचे लक्ष लागले आहे.