

Sujay Vikhe BJP responsibility
नगर: भाजप पक्षाने माझ्यावर टाकलेली प्रदेश महामंत्री पदाची जबाबदारी संपत आली आहे. पक्ष पुन्हा ही जबाबदारी देईल की नाही माहीत नाही. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर आगामी काळात पक्ष मोठी जबाबदारी टाकणार असल्याचे सूतोवाच भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने प्रदेश भाजपाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांसाठी बंधन लॉनवर जिल्हा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. (Latest Ahilyanagar News)
त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना महामंत्री चौधरी बोलत होते. यावेळी सहसंयोजक आमदार मंगेश चव्हाण, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, आमदार मोनिका राजळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, नगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व नितीन दिनकर आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. राज्यात बारा मराठा मुख्यमंत्री झाले. कोणी आरक्षण दिले नाही. शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. काही वर्षे केंद्रांत मंत्री होते. त्यावेळेस पंतप्रधानांना सांगून मराठा समाजाला आरक्षण देण्याची तसदी घेतली नाही.
स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिले. याप्रकरणे न्यायालयात याचिका दाखल झाली. मध्यंतरी अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार होते. त्यांनी आरक्षण टिकावे यासाठी न्यायालयात बाजूच मांडली नाही. उध्दव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले अशी टीका चौधरी यांनी यावेळी केली.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 30 हजारांवर भाजप कार्यकर्ते आहेत. जनतेच्या सेवेसाठी हे कार्यकर्ते 24 तास रस्त्यांवर आहेत. त्यांच्यातील उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. देव, देश आणि धर्मासाठी कार्य करणारा हा कार्यकर्ता 17 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या सेवा पंधरवाड्यात जोरदार काम करुन जिल्हा राज्यात एक क्रमाकांवर आणल्याशिवाय राहाणार नाही असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठेपणा
मराठा समाज आंदोलनाची परिस्थिती आणीबाणीची होती. प्रसंग बाका होता. अशा परिस्थितीत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. खरे तर यामध्ये विखे पाटील यांचेच चातुर्य होते. असे असताना देखील त्यांनी हे सर्व श्रेय मोकळेपणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच असल्याचे म्हटले. हा विखे पाटील यांच्या मनाचा मोठेपणा असून हे फक्त नगर जिल्हाच करु शकतो. असे गौरवोदगार चौधरी यांनी काढले.