Vikhe Patil Ram Shinde Meeting Pudhari
अहिल्यानगर

Vikhe Patil Ram Shinde Meeting: विखे-शिंदे यांच्यातील राजकीय वितुष्ट संपणार? दीड तासाच्या भेटीनंतर एकत्र येण्याचे संकेत

जिल्हा बँक निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा; भविष्यात एकत्र राजकारण करण्याची राम शिंदे यांची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने एकाच पक्षात असूनही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सभापती राम शिंदे यांच्यात वितुष्ट आल्याचे जिल्हाच काय तर अवघ्या राज्याने पाहिले. बँकेचा निकाल लागला अन्‌ आता अध्यक्ष पदाची निवडणूक व्हायची असली तरी सहकार विकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. बँक निवडणुकीत ताणलेले संबंध आणि मंत्री विखे पाटील यांची शुक्रवारी सभापती राम शिंदे यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीला महत्त्व आले.

या भेटीत सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सभापती प्रा. राम शिंदे यांचाही सूर बदलल्याचे समोर आले. सहकारातील निवडणुकीची मंत्री विखे पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेला सभापती शिंदे यांनी तितक्यात सकारात्मतेने प्रतिसाद दिला. सहकारातील निवडणुकीत जे विखे पाटील यांच्यासोबत होते, ते पुढे नसेल. आम्ही एकाच पक्षात असून भविष्यातील राजकारणात एकत्र असू, तेथे सहकाराचे राजकारण येणार नाही, असे सूचक वक्तव्य करतानाच सभापती शिंदे यांनी सहकारातील राजकारण संपले आता भविष्यातील एकीचे संकेतही दिले.

भेट नियोजित: मंत्री विखे पाटील

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट नियोजित होती. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांच्या घरी आलो. यापूर्वी येणे शक्य झाले नव्हते; मात्र यंदा दिवाळीच्या निमित्ताने भेट घेता आली. आमच्यात राजकीय विषयांबरोबरच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतही चर्चा झाली. जिल्हा बँकेची निवडणूक संपली असून तो विषयही संपला आहे, असे स्पष्ट करताना विखे पाटील यांनी अधिकचे भाष्य टाळले.

आम्ही एकाच पक्षात: सभापती प्रा. राम शिंदे

पालकमंत्री विखे पाटील यांनी दिपावलीनिमित्त सदिच्छा भेट दिली. जिल्हा बँक निवडणुकीत त्यांनी सर्वपक्षीय पॅनल केला. मला सहभागी करता आले नाही. कर्जत आणि जामखेडमधील माझे दोन्ही प्रतिनिधी निवडून आले आहेत. ताणलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करावे असे कदाचित त्यांना वाटले असेल. सहकारातील निवडणुकीत त्यांना थोरात जवळचे वाटले, मी स्व पक्षातील असूनही लांब गेलो. मात्र आम्ही एकाच पक्षात आहोत. सहकारातील निवडणूक संपली, आता भविष्यात एकत्र राजकारण करायचे आहे. बँकेत जे सोबत होते, ते पुढे त्यांच्यासोबत राहणार नाहीत. आम्ही सोबत राहणार आहोत, अशी भूमिका सभापती शिंदे यांनी माध्यमांसमोर मांडली. सहकाराचा विषय तेथे येणार नाही. एकमेकांना सहकार्य करून सहकार टिकायाची ही भूमिका सहकारातील नेत्यांनी राहिली.

बहुमतांमुळे त्यांना आवश्यकता नाही

सहकार विकास आघाडीकडे १८ संचालकांचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांना आमची आवश्यकता नाही. जिल्ह्यातील सहकार टिकविण्यासाठी सहकारातील सर्वांना सोईस्कर रित्या एकमेकांना सहकार्य केले. तालुकानिहाय भूमिका वेगवेगळ्या होत्या अशी भूमिका सभापती शिंदे यांनी मांडली. मी सहकारात नवा होतो, मात्र दोन संचालक बँकेत पाठवून माझी ताकद सिद्ध केली, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

संचालक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

जिल्हा बँकेच्या संचालकांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाठवले जाणार असल्याची भूमिका पालकमंत्री विखे पाटील यांनी चर्चेदरम्यान मांडल्याचे सभापती शिंदे यांनी माध्यमांसमोर सांगितले. मुख्यमंत्री हे राज्याचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी संचालकांसोबतच्या बैठकीला बोलावले तर नक्की जावू. सहकार टिकविण्याची भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे, अशी सकारात्मक भूमिका सभापती शिंदे यांनी मांडली.

दीड तासात काय झालं, गुरुवारी कळणार

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड गुरूवारी (दि.१२) होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील, आ. मोनिका राजळे, माजी मंत्री शंकरराव गडाख व बिपीन कोल्हे यांच्या भोवती अध्यक्ष पदाच्या नावाची चर्चा फिरते आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील व सभापती राम शिंदे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले. विखे-शिंदे यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील बाहेर आ नसला तरी त्याला बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची किनार नक्कीच असणार असा कयास बांधला जातो. या भेटीत नेमकं काय ठरलं, कोणाचे नाव फायनल झाले की त्यावर नुसतीच चर्चा झाली की दोघे मिळून मुख्यमंत्री यांना ‘निरोप’ देणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी त्याचे उत्तर गुरूवारीच मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT