कर्जत-जामखेडमधील अतिवृष्टीग्रस्त गावांची पालकमंत्री डॉ. विखेंकडुन पाहणी Pudhari
अहिल्यानगर

Karjat Jamkhed flood relief : एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री डॉ. विखे यांचे आश्वासन

कर्जत-जामखेडमधील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी; पंचनाम्यानंतर मदत मिळणार

पुढारी वृत्तसेवा

कर्जत/जामखेड : कर्जत व जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतपिके, शेतजमीन, ओढे, नाले व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या पंचनाम्यानंतर मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)

जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व पर्यटन, खनिज व माजी सैनिक कल्याणमंत्री शंभूराजे देसाई यांनी कर्जत व जामखेड तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांची संयुक्त पाहणी केली. या वेळी त्यांनी उपस्थित नागरिक, महिलांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.

कर्जत तालुक्यातील मलठण, तरडगाव, निंबोडी, सीतपुर, होलेवाडी, चिलेवाडी आणि नवलेवाडी परिसरातील नुकसानीची, तसेच कुकडी डाव्या कालव्याच्या भागाची पाहणी करण्यात आली. या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी त्यांनी समजून घेतल्या. पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले.

मलठण येथे पावसामुळे शेतपिके व शेतजमिनीचे झालेले नुकसान पाहण्यात आले. सीना नदीवरील बंधाऱ्याच्या नुकसानीची माहिती घेत सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या. तात्पुरती दुरुस्ती करून घेण्याचेही निर्देश मंत्र्यांनी दिले.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, की जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पहिल्यांदाच झाला असून त्याचा आपण समर्थपणे सामना करत आहोत. नुकसानीच्या पंचनाम्यांपासून एकही गाव सुटणार नाही व एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत करण्यात येत आहेत. अनेक गावांमध्ये अजूनही पाणी साचलेले असून अशा ठिकाणी 7/12 वरील नोंदीनुसार सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तरडगाव येथील ग्रामस्थांशीही विखे पाटील यांनी संवाद साधला. निंबोडी येथे शेतपिकांच्या नुकसानीची, सीतपूर येथे सीना नदीवरील खडकत बंधाऱ्याची, मोहरी येथील तलावाची धनेगाव येथील नुकसानीची पाहणी मंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. सीतपूर येथे आमदार सुरेश धस हेदेखील उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कुकडी सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, जिल्हा जलसंधारण अधिकारी पी. बी. गायसमुद्रे, कार्यकारी अभियंता उत्तम धायगुडे, कार्यकारी अभियंता विनायक नखाते, तसेच प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार गुरू बिराजदार, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, अशोक खेडकर, राजेंद्र गुंड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन तोरडमल, बापूसाहेब नेटके, संग्राम पाटील, शहाजीराजे भोसले, डॉ. सुरेश भिसे, शोएब काजी, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : शंभूराजे देसाई

पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, शेतकरी बांधवांनो घाबरू नका. अशा संकटाच्या काळात शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पावसामुळे वाहून गेलेल्या जमिनी, गाळ साचलेल्या विहिरी यासह सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ दोन दिवसांत विविध भागांची पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिलासा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुकडी कालव्याचे रुंदीकरण तातडीने करावे

या भागातून जाणाऱ्या कुकडी कालव्याच्या अवतीभोवती अतिक्रमण झाल्याने व भराव खचल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाड्या-वस्त्यांमध्ये शिरले. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. या समस्येची दखल घेत मंत्री विखे पाटील यांनी कुकडी प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता अहीरराव यांना कालव्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचे सर्वेक्षण तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. गाळ काढण्याचे काम तातडीने करावे. परिसरातील पाझर तलावांची दुरुस्ती करावी. गावकऱ्यांच्या मागणीनुसार पाडळ वस्ती व नवले-शिंदे वस्ती येथे पूल उभारणीसाठी सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच छोटे लोखंडी पूल उभारण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT