बोधेगाव : वंजारी समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गातील एसटी आरक्षण सरकारने तत्काळ मंजूर करून स्वतंत्र महामंडळ स्थापन केल्याशिवाय मागे हटणार नाही. त्यासाठी वेळप्रसंगी वाटेल ती किंमत मोजून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा जय भगवान संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला. शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे यांनी आश्वासन दिल्यानंतर दोन तासांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले.(Latest Pune News)
या प्रमुख मागणीसाठी परमेश्वर केदार, अभिजित गिते आणि युवराज जवरे यांनी दि. 1 पासून वाडगाव (थाटे, ता. शेवगाव) येथे आमरण उपोषण पुकारण्यात आले आहे. आज सातव्या दिवशी उपोषण सुरू आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (दि. 7) सकाळी 10 वा. बोधेगाव येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकात शेवगाव- गेवराई राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते. तहसीलदार आकाश दहाडदे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आपल्या मागण्या व भावना वरिष्ठांकडे कळविण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिल्यानंतर पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनामुळे शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या वेळी आंदोलकांनी वंजारी समाजाच्या आरक्षण काढण्याची मागणी करणाऱ्यांचा चांगला समाचार घेतला. भविष्यात जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
आंदोलनात माणिक गर्जे, गंगाधर खेडकर, शरद सोनवणे, रामजी अंधारे, बाळासाहेब शिरसाट, बाळासाहेब वाघ, नितीन फुंदे, संदीप फुंदे, समता परिषदेचे संगीता ढवळे, सरपंच शीतल केदार, महादेव जवरे, अशोक ढाकणे, छाया जवरे, बटुळे बाबा, राजेंद्र दौंड, भाजप राज्य सरचिटणीस अरुण मुंडे, बाळासाहेब सानप यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. मोर्चात जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांना मार्गदर्शन करताना उन्हामुळे चक्कर आल्याने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
या वेळी समाजाचे विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, महिला, ग्रामस्थ भर उन्हात सहभागी झाले होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बटुळे यांनी केले. आभार डॉ. दराडे यांनी मानले.
आज थाटे वाडगावला बैठक
राज्यभर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (दि. 8) थाटे वाडगाव येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बोधेगाव ः वंजारी समाजाच्या आरक्षण मागणीसाठी वाडगावात पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बोधेगाव येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.