Crop Damage Pudhari
अहिल्यानगर

Crop Damage: अवकाळी नुकसान भरपाईसाठी प्रशासनाची 21 कोटींची मागणी

अंतिम अहवाल सादर; वीस हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

पुढारी वृत्तसेवा

नगर: एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जिल्ह्यातील 193 गावांना फटका बसला असून, या गावांतील 12 हजार 131 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. याचा आर्थिक फटका 20 हजार 922 शेतकऱ्यांना बसला असून, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अदा करण्यासाठी 20 कोटी 93 लाख 48 हजार 890 रुपये निधी अपेक्षित असल्याचे शासनाला पाठविलेल्या अंतिम अहवालात म्हटले आहे.

जिल्ह्यात यंदा उशिरा रब्बी पिकांची पेरणी झाली. त्यामुळे पिकांची काढणी उशिरापर्यंत सुरू होती. काढणी सुरू असतानाच 22 व 23 एप्रिल 2026 रोजी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने पारनेर, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, राहुरी, नेवासा, संगमनेर, कोपरगाव, राहाता आदी दहा तालुक्यांतील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. या पिकांचे आणि फळबागांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, झेडपी सीईओ आनंद भंडारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या संयुक्त सहीने नुकसानीचा अंतिम अहवाल नुकताच विभागीय आयुक्त यांच्या मार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

नेवासा तालुक्यात सर्वाधिक 6 हजार 336 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या तालुक्यातील 10 हजार 294 बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सर्वाधिक 10 कोटी 85 लाख 35 हजार रुपये अनुदान वाटप होणार आहे. अनुदान वाटपासाठी शासनाकडून 20 कोटी 93 लाख 48 हजार रुपयांचे अनुदान अपेक्षित आहे.

तालुकानिहाय गावे व बाधित शेतकरी संख्या

नेवासा : 82 (10294), कोपरगाव : 27 (2060), राहाता : 21 (2109), पारनेर : 10 (2224), राहुरी : 16 (2760), संगमनेर : 9 (347), पाथर्डी : 17 (1023), कर्जत : 3 (16), जामखेड : 5 (52), श्रीगोंदा : 3 (28)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT