Ujani Dam Pollution Pudhari
अहिल्यानगर

Ujani Dam Pollution: उजनी धरणात जलपर्णीचा विळखा; मच्छिमारांच्या उपजीविकेला धोका

भीमा पात्रातील पाणी हिरवट, ऑक्सिजन घटल्याने मासेमारी ठप्प; सांडपाण्यावर नियंत्रणाची जोरदार मागणी

पुढारी वृत्तसेवा

खेड: उजनी धरणाच्या फुगवट्यातील भीमा पात्रात सध्या जलपर्णीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, पाण्याचा रंग अक्षरशः हिरवट झाला आहे. जलपर्णी वाढल्यामुळे पाण्यात सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असून, त्याचा थेट परिणाम माशांच्या वाढीवर होत आहे. त्यामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

उजनी धरणाच्या फुगवट्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असून, सध्या जलपर्णीच्या प्रादुर्भावामुळे काही भागांमध्ये मासे मृत्युमुखी पडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मच्छी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक मच्छिमारांना अपेक्षित मासेमारी होत नसल्याने त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, काही कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरांमधील सांडपाणी थेट भीमा नदी व उजनी धरणात सोडले जात असल्याने, तसेच साखर कारखाने व इतर औद्योगिक घटकांकडून येणारे अंशतः शुद्ध किंवा अशुद्ध सांडपाणी पाण्यात मिसळत असल्याने जलपर्णीची वाढ होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. यासोबतच शेतीत वापरण्यात येणारी रासायनिक खते व कीटकनाशके पावसाच्या पाण्यासोबत धरणात येतात. धरणातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने पाणी साचून राहत असून, त्यातून नायट्रोजन व फॉस्फरसचे प्रमाण वाढत आहे. याच कारणांमुळे जलपर्णी वेगाने वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जलपर्णीने व्यापलेले व दूषित झालेले पाणी शेतीसाठी वापरल्यास पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता असून, जमिनीची सुपीकताही कमी होऊ शकते. तसेच या पाण्याच्या संपर्कात आल्यास त्वचारोग, पोटाचे विकार व इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हे पाणी वापरताना नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

जलपर्णी काढण्यासाठी यांत्रिक स्वच्छता मोहीम राबवावी, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प प्रभावीपणे कार्यान्वित करावेत, तसेच औद्योगिक सांडपाण्यावर कडक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी मच्छीमार व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. मात्र, या गंभीर समस्येवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याने हा प्रश्न वर्षानुवर्षे तसाच प्रलंबित राहिला आहे.

सगळी घाण शेवटी उजनीच्या पोटात..!

उजनी फुगवट्याचा प्रवाह थांबल्यामुळे जलपर्णी झपाट्याने वाढत असून, पाण्याचा रंग हिरवट होत आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि पुणे जिल्ह्यातील पावसाचा लोंढा पूर बनून खालच्या दिशेने वाहत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती कायम राहते. मात्र, अखेरीस शहरांमधील व औद्योगिक सांडपाण्याची सगळी घाण उजनी धरणाच्या पोटात जाऊन विसावते ही बाब खूपच धोकादायक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT