सिद्धटेक: या वर्षी पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा थेट फटका आता उजनी जलाशयावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी उजनी जलाशयावरील वैयक्तिक उपसा सिंचन धारकांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा नियंत्रित करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या निर्णयानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील १९ गावांमधील कृषिपंपांचा वीजपुरवठा 'एक दिवस पूर्णपणे बंद आणि दुसऱ्या दिवशी केवळ ६ तास चालू' ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातील पाणी राखून ठेवण्याचे आदेश आहेत.
या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी बचतीसाठी कृषिपंपांा वीजपुरवठा नियंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती केली होती.
या पत्राची दखल घेत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यातील भांबोरा, दुधोडी, हिंगणगाव, बेर्डी, सिद्धटेक, देऊळवाडी, जलालपूर, बाभुळगाव, शिंपोरा, औटेवाडी, करपडी, खेड, गणेशवाडी, वायसेवाडी, राशिन, करमनवाडी, आखोणी, बारडगाव सुद्रिक., बारडगाव दगडी गावांमधील शेतीपंपांच्या वीजेवर कात्री लागली आहे:
ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर व पिकांच्या महत्त्वाच्या टप्प्यावर वीजपुरवठ्यात मोठी कपात झाल्याने कर्जत तालुक्यातील उजनीकाठच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आता पाण्याचे नियोजन कसे करायचे, या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. यामुळे चालू हंगामातील ऊस , कांदा , गहू , हरभरा , व फळबागा धोक्यात येऊ शकतात . ही पिके निघेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली आहे.